लहान मुलीवर अत्याचार... दोषींना फाशीची शिक्षा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 21:14 IST2021-01-04T21:13:51+5:302021-01-04T21:14:09+5:30
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महिलांची निदर्शने

लहान मुलीवर अत्याचार... दोषींना फाशीची शिक्षा द्या
धुळे : रायगड जिल्ह्यातील पेण येथे आदिवासी चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीने केली आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. या वेळी जिल्हाध्यक्षा शोभा नगराळे, शोभा बिऱ्हाडे, डाॅ. जयश्री वानखेडे, ॲड. सुप्रभा ठाणगे, रजमी ठाकूर, मालती सूर्यवंशी आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी समाजाच्या तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, जलदगती न्यायालयात खटला चालवावा, विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, पीडितेच्या कुटुंबीयांना मनोधैर्य योजनेअंतर्गत अर्थसाहाय्य त्वरित द्यावे आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.