सोनेवाडी गावात कुटूंबावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:27 IST2021-06-04T04:27:30+5:302021-06-04T04:27:30+5:30
धुळे : तालुक्यातील सोनेवाडी गावात पूर्ववैनस्यातून दहा जणांच्या जमावाने एका कुटूंबावर प्राणघातक हल्ला केल्याने महिलेसह तीन जण गंभीर जखमी ...

सोनेवाडी गावात कुटूंबावर प्राणघातक हल्ला
धुळे : तालुक्यातील सोनेवाडी गावात पूर्ववैनस्यातून दहा जणांच्या जमावाने एका कुटूंबावर प्राणघातक हल्ला केल्याने महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या गटाने देखील फिर्याद दिली आहे.
सोनवाडी ता. धुळे गावात मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमाराला ही घटना घडली. कोमल गोटू गवळी (४५) हा मोटारसायकलीने शेतात जात असताना गोरख जिभाऊ माेरे याने अडविले. मागणी भांडणाचा राग मनात धरुन भांडण केले. शिवीगाळ, धक्काबुक्की केली. त्यानंतर दहा जणांच्या जमावाने लाठ्या-काठ्या, सळई, कुऱ्हाडीच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला चढवला. भांडण सोडविण्यासाठी आलेले सहाधू महादू गवळी याला योगेश रामदास पिंजन याने शिवीगाळ करीत डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. राहुल सखाराम पिंजन याने सळईने पाठीवर मारहाण केली. सनिता नाना गवळी या महिलेस कुणीतरी विट मारुन फेकली. तसेच चित्रा कोमल गवळी या महिलेस कृष्ण सहादू गोलंगी आणि भरत सहादू गोलंगी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन विनयभंग केला. तिच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याची सोन्याची पोत तोडून गहाळ केली. त्यानंतर या जमानावाने घरात घुसून घरातील सामानाची नासधुस केली. दगडफेक करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात सहाधु महादू गवळी, शांताराम महादू गवळी, सुनिता नाना गवळी हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी कोमल गोटू गवळी याने दिलेल्या फिर्यादीवरुन योगेश रामदास पिंजन, गोरख जिभाऊ मोरे, कृष्णा सहाधु गोलंगी, भरत सहाधु गोलंगी, जयदीप सखाराम पिंजन, राहुल सखाराम पिंजन, पुंजाराम लक्ष्मण लोखणे, भाऊसाहेब सुभाष मोरे, महादू पिरन मलीक, गंभीर रोडमल शेळके सर्व रा. सोनेवाडी यांच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ४५२, ३५४, ४२७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी योगेश पिंजन, गोरख मोरे, कृष्णा गोलंगी, भरत गोलंगी या चार जणांना अटक करण्यात आली आहे. इतर संशयितांचा शोध सुरु आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक बी. आर. काेते करीत आहेत.
दुसऱ्या गटाची फिर्याद
सोनेवाडी घटनेतील दुसऱ्या गटातील भरत सहाधु गोलंगी याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील अशोक देवबा मोरे यांच्याकडे गोंधळाचा कार्यक्रम होता. घरासमोर नातेवाईक जमले होते. भरत गोलंगी विठ्ठल मंदीरात हरीपाठ करीत होता. कोमल गवळी हा मोटारसायकलने जात असताना अशोक मोरेचा पुतण्या जभाऊला कट मारल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी भगवान गवळी याने कोयत्याने हातावर वार करुन जखमी केले. या फिर्यादीनुसार कोमगल गोटू गवळी, भगवान गोटू गवळी यांच्याविरुध्द भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड काॅन्स्टेबल योगेश नारायण सोनार करीत आहेत.