ॅशिरपूर तालुक्यातील जळोद येथील आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 12:45 IST2020-02-21T12:45:20+5:302020-02-21T12:45:47+5:30
असुविधेबद्दल विद्यार्थी आक्रमक : प्रकल्प अधिकारी कार्यालयातर्फे समस्या सोडविण्याचे आश्वासन

ॅशिरपूर तालुक्यातील जळोद येथील आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा
आॅनलाइन लोकमत
शिरपूर (जि.धुळे) : तालुक्यातील जळोद येथील आश्रमशाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण न मिळणे, विद्यार्थिनींसाठी शौचालयाच्या सुविधाचा अभाव, पोटभर जेवण न मिळणे, आजारी पडल्यावर दवाखान्या वेळेवर न नेणे आदी समस्या घेवून शाळा व्यवस्थापनच्या विरोधात विद्यार्थ्यांनी शिरपूरला पायी मोर्चा काढला. दरम्यान धुळे येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयातर्फे समस्या सोडविण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर अर्थे (ता.शिरपूर) येथून विद्यार्थी मागे परतले.
जळोद येथे आदिवासी प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रम शाळा आहे. दहावीपर्यंत असलेल्या या शाळेत एकूण ७७९ मुले - मुली शिक्षण घेतात. या आश्रमशाळेत शौचालयाची सुविधा नाही, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही, नियमित स्वच्छता होत नाही. आजारी पडल्यावर वेळेवर दवाखाना नाही. पोटभर जेवण मिळत नाही. ग्रंथालय, प्रयोगशाळा नाही असे या शाळेतील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे येथे मुलीही शिक्षण घेताहेत. मात्र त्यांना शौचासाठी बाहेर जावे लागते. या सर्व बाबींकडे शाळा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
दरम्यान आश्रमशाळेतील विद्यार्थी शिरपूरकडे पायी मोर्चाने येत असल्याची माहिती मिळताच आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे विस्तार अधिकारी ए.पी.जाधव हे तेथे पोहचले. अर्थे येथे विद्यार्थ्यांना थाबवून त्यांच्याशी चर्चा केली. लेखी आश्वासनानंतर विद्यार्थ्यानी आंदोलन मागे घेत, ते पुन्हा शाळेत परतले.
तर मोर्चा काढू
विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना सुविधा द्याव्यात. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा बिरसा क्रांती दलाचे शिरपूर तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे यांनी दिला आहे. दरम्यान प्रकल्प अधिकाऱ्यांनी या शाळेला गुरूवारी भेट दिली होती.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळतात. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. त्यांनी केलेले आरोप चुकीचे आहे.
शरद जमादार,
मुख्याध्यापक,आदिवासी आश्रम शाळा, जळोद,ता. शिरपूर