घरकुल निधीसाठी मनपाची केंद्राकडे विनवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST2021-06-09T04:44:20+5:302021-06-09T04:44:20+5:30
प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना स्वत:च्या जागेवर हक्काचे घर किंवा विस्तारासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सहा टप्प्यात ...

घरकुल निधीसाठी मनपाची केंद्राकडे विनवणी
प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना स्वत:च्या जागेवर हक्काचे घर किंवा विस्तारासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सहा टप्प्यात अडीच लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. दरम्यान, या योजनेच्या लाभासाठी मनपा क्षेत्रातील लाभार्थ्यांनी २०१९ - २०२०मध्ये घरकुलांचे ४२५६ प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी ३०० घरकुल योजनेसाठी पात्र असल्याने या लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात राज्य सरकारचा एक लाखांचा टप्पा मिळाला. त्यामुळे दुसरा निधी मिळेल, या आशेवर अनेकांनी जुने मातीचे घर पाडून नवीन घरकुल बाधकाम सुरू केले. मात्र, केंद्र सरकारकडून दीड लाखांचा निधी न मिळाल्याने तब्बल २०१ घरकुलांचे काम रखडले आहे.
९९ घरकुलांचे काम पूर्णत्त्वास
महानगरात पहिल्या टप्प्यात ३०० घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. घरकुल बांधकामासाठी टप्प्या-टप्प्यात निधी दिला जाणार होतो. मात्र, तीन वर्षांपासून मनपाकडे पाठपुरावा करूनदेखील निधी न मिळाल्याने अनेकांच्या घरकुलांचे काम अपूर्ण होते. त्यातील काही लाभार्थ्यांना घरच नसल्याने खासगी कर्ज काढून काहीनी घरकुलांचे बांधकाम पूर्ण केलेे आहे. त्यामुळे आतापर्यत ३०० पैकी ९९ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहेत, तर २०१ लाभार्थी निधीचा दुसरा टप्पा मिळण्यासाठी ३ वर्षांपासून मनपाकडे पाठपुरावा करीत आहेत.
मनपाचा केंद्राकडे तीन वर्षांपासून निधीसाठी पाठपुरावा
पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना केंद्र सरकारचा निधी न मिळाल्याने अनेकांना मनपाकडे पायपीट करावी लागत आहे. मनपा बांधकाम विभागाकडून केंद्र सरकारच्या म्हाडा विभागाकडे आतापर्यंत १० ते १२ वेळा केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, अद्याप एकाही पत्राचे उत्तर या विभागाकडून देण्यात आलेले नाही.
शहरात ३९ शासकीय झोपडपट्टी
अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी ग्रामपंचायत व महापालिका हद्दीतील अतिक्रमणधारकांची माहिती जमा करण्यासाठी खासगी कंपनीला ठेका देण्यात आला आहे. सध्या शहरात ३९ शासकीय जागांवर (घोषित झोपड्या) आहेत, तर १९ अघोषित झोपड्या, ७ फूट पाथवरील झोपडपट्टया, ६० कॉलनी, नगर व विविध भागातील झोपडपट्ट्या आदी माहिती घेतली जात आहे.
माहितीसाठी मनपात स्वतंत्र विभाग
शहरातील घरकुल लाभार्थ्यांना पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या जुन्या इमारतीतील नाव नोंदणीची व्यवस्था केली आहे. घरकुल प्रकरणे मंजूर झाल्यांनतर लाभार्थ्यांंकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. लाभार्थ्यांनी बांधकाम आराखडे सादर केल्यानंतर कामांना मंजुरी देण्यात आली आहे. लाभासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
शासकीय जागेचे सर्वेक्षण पूर्ण
शहरातील जुनी भिलाटी, विष्णूनगर, जमनागिरी भिलाटी, मोगलाई मशिद, भीमनगर, यशवंतनगर, शनिनगर, साईबाबानगर, फाशीपूल, पिराची टेकडी मोहाडी, नगावबारी, चक्करबर्डी, कदमबांडे नगर देवपूर, शाळा क्र. २ जुने धुळे, गायकवाड चौक, गांधी पुतळा जवळ पाटासमोर, संगम हॉटेलजवळ पाटावर अशा सुमारे १३५ झोपड्यांपैकी ६ हजार लाभार्थ्याचे सर्वेक्षण केले आहे.
जागेचा प्रश्न सुटणार
स्वमालकीची जागा नसल्याने शहरातील बहुसंख्य कुटुंबांना घरकूल योजनेचा लाभ मिळालेला नाही. यातील बहुतांश कुटुंबे वर्षानुवर्षे सरकारी जागेवर राहत आहेत. परंतु, या कुटुंबांकडे जागेचा मालकी हक्क नसल्याने हक्काचे घर मिळण्यास मोठी अडचण दूर होणार आहे. आता गोरगरीब नागरिकांना त्यांच्या हक्काचा निवारा उपलब्ध होणार आहे. त्यांचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
मनपाचा पाठपुरावा सुरू
पंतप्रधान घरकुल योजनेतील महापालिकेकडे ४२५६ लाभार्थ्यांनी तीन वर्षापुर्वी प्रस्ताव सादर केले होते. मात्र देशात कोरोना महामारीमुळे निधी मिळण्यास शासकीय पातळीवर अडचणी निर्माण होत आहे. मात्र, घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी मनपाकडून पाठपुरावा सुरू आहे.
अजिज शेख
आयुक्त, मनपा