जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील काही प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांना या मोबाइल ॲपचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत. या ॲपच्या मदतीने रस्ते वाहतूक व महामार्ग अपघात टाळण्यासाठी मोठी मदत हाेत आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याचा ठाणेदार हा ॲडमिन तर बाकीचे अधिकारी, कर्मचारी हे फिल्ड ऑफिसर म्हणून काम करण्यात आले आहे. ॲडमिनचा एक युजर आयडी असते. तो त्या गाडीत किती अपघात घडले, याची नोंद घेण्यात आली किंवा नाही, हे स्वतः पाहत असतो. या नवीन ॲपच्या मदतीने अपघात रोखण्यास निश्चितच मदत होणार आहे. आतापर्यंत दहा लाइव्ह केसेस इंट्री करण्यात आल्या आहेत.
असे चालणार कामकाज
आयआरएडी या प्रकल्पाचे कामकाज असे चालणार आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला आहे. तेथील दोन अधिकारी व एक पोलीस उपनिरीक्षक घटनास्थळावर दाखल होतील. त्यानंतर, अपघाताचे छायाचित्र, व्हिडीओ दिलेल्या ॲपवर अपलोड करतील. यासोबतच वाहनांची संपूर्ण माहिती चेसिस क्रमांक, वाहनाचा क्रमांक, चालकाचा परवाना व चालकाची संपूर्ण माहिती, तसेच अपघात कोणत्या कारणामुळे घडला, हे सर्व विश्लेषण करून संबंधित अधिकारी कर्मचारी ही माहिती ॲपवर अपलोड करणार आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर दोन फिल्ड अधिकारी आणि एका पोलीस अधिकाऱ्याची अशा प्रकारे एकूण तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे. अपघातांची संपूर्ण माहिती एकत्रित करून ती ॲपवर पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर, अपघाताचे तांत्रिक विश्लेषण चेन्नई येथून होणार आहे. अपघात कमी करण्यासाठी हा प्रकल्प आहे.