झिंक गोळ्याचे आरोग्य विभागांतर्गत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 14:42 IST2019-06-09T14:41:59+5:302019-06-09T14:42:41+5:30
संडे अँकर । अतिसार नियंत्रण पंधरवड्याच्या माध्यमातून जनजागृती अभियान

dhule
धुळे : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवण्यात येत आहे. या पंधरवड्यांतर्गत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शहरातील विविध भागात जनजागृतीसह प्रबोधन करून झिंंक गोळ्यांचे वाटप केले जात आहे़
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अर्भक मृत्यूदर व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न होत आहे. अतिसारामुळे बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळयात जास्त असते. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे अतिसार नियंत्रण पंधरवड्यांतर्गत अतिसार झाल्यावर घ्यावयाची काळजी, ओआरएस पाकिटे व झिंक गोळ्या यांचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिके दाखवण्यात येत आहे़ तसेच ओआरएस पाकिटे व झिंक गोळ्यांचे घरोघरी वाटप करून नागरिकांना माहिती दिली जात आहे़ या मोहिमेतून आरोग्य संस्थांमध्ये ओआरएस व झिंक कोपरा तयार करण्यासह अतिसार झालेल्या बालकांवर उपचार विभागातर्फे केले जात आहे़
जनजागृती मोहीम
महापालिका कार्यक्षेत्रात पाच वषार्खालील बालकांचा सर्व्हेे करून त्यांना ओआरएस पाकिटाचे मोफत वाटप केले जात आहे. शहरातील झोपडपट्टी, विटाभट्टी, जोखीमग्रस्त कार्यक्षेत्रासह इतर प्रभागामध्ये जावून ओआरएस व झिंकचे महत्त्व, स्तनपान, स्वच्छतेचे महत्त्व आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे़
मोहिमेसाठी समिती गठीत
अतिसार नियंत्रण मोहीम व अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आली आहे़ या मोहिमेचे व्यवस्थापन, संनियंत्रण व अंमलबजावणीसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिका स्तरावर सुकाणू समिती गठीत झाली आहे. समितीत आरोग्य विभागासोबत मनपाचा महिला बालकल्याण, पाणीपुरवठा विभाग, शिक्षण विभाग तसेच भारतीय वैद्यकीय संघटना, भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.