धुळे जिल्ह्यात ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 13:22 IST2019-04-26T13:21:41+5:302019-04-26T13:22:49+5:30
खरीप हंगाम २०१९-२० आढावा बैठक, १५ मे पासून कापूस बियाणे उपलब्ध

धुळे जिल्ह्यात ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट
आॅनलाइन लोकमत
धुळे :२०१९-२० या वर्षात जिल्ह्यात ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवडीचे उद्दिष्ट असून, त्यात २ लाख ३२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे १२ हजार ५०० लाख रकमेचे कर्ज वाटपाचे लक्ष असून आज अखेर १२ हजार ५०९ शेतकऱ्यांना ५९६७.४८ लाखाचे कर्ज वाटप झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
खरीप हंगामपूर्व आढावा बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठता डॉ. अशोक मुसमाडे, वनविभागाचे उपवनसंरक्षक शेंडगे होते.
बैठकीच्या सुरवातीला कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील यांनी कापसावरील बोंडअळीवबाबत माहिती दिली २०१७-१८ यावर्षात जिल्ह्यात कापूस पीकावरील गुलाबी बोंडअळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र २०१८-१९ यावर्षात बोंडअळीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याने, बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी चारा नियोजन, कृषी पंप विद्युत पुरवठा, कृषी यांत्रिकीकरण, पंतप्रधान पीक विमा येजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनां आदींची सविस्तर माहिती सभागृहाला दिली.
गेल्यावर्षी ८६ टक्के
क्षेत्रावरच पेरणी
२०१८-१९ या वर्षातील खरीप हंगामासाठी ४ लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र पावसाच्या अनियमिततेमुळे जिल्ह्यात ४ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावरच पेरणी होऊ शकली. त्याची टक्केवारी ८६.२९ एवढी होती. गेल्यावर्षी आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने खरीपाचे उत्पादनात घट आली होती.
४० हजार ३२५
क्विंटल बियाण्याची मागणी
खरीप हंगामासाठी एकूण ४० हजार ३२५ क्विंटल विविध पिकांचे तसेच १० लाख ४४ हजार कापूस बियाण्यांच्या पाकीटांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आलेली आहे. यात महाबिजकडून कापूस वगळता ४ हजार ३३ क्विंटल विविध पिकांचे बियाणे व खाजगी कंपनीमार्फत ३६ हजार २९३ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. बीटी कपाशीचे १० लाख ३५ हजार पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. यावर्षी १५ मे नंतरच बीटी कापसाचे बियाणे उपलब्ध होतील.
खरीपात पिकांना खते मोठ्या प्रमाणावर द्यावी लागतात. त्यामुळे जिल्हयासाठी १ लाख १३ हजार ९०० मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. गेल्यावर्षाचा २९ हजार ८५२ मेट्रीक टन खतांचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे जिल्ह्याला खरीप हंगामात १ लाख ४३ हजार ७५२ मेट्रीक टन खतांचा पुरवठा होणार असल्याची माहिती देण्यात आली.