स्वातंत्र्यानंतर शिंदखेड्याचे राजकारण पाण्याभोवतीच फिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:22 AM2017-12-02T11:22:28+5:302017-12-02T11:23:23+5:30

शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक; राजकीय हालचालींना वेग : सत्ता द्या; पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याचे मतदारांना आश्वासन

After independence, Shindkhed's politics wandered around the water | स्वातंत्र्यानंतर शिंदखेड्याचे राजकारण पाण्याभोवतीच फिरले

स्वातंत्र्यानंतर शिंदखेड्याचे राजकारण पाण्याभोवतीच फिरले

Next
ठळक मुद्देअवघ्या काही दिवसांवर शिंदखेडा नगरपंचायत येऊन ठेपल्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपाची राजकीय सूत्र लालचंद नगर येथील अनिल वानखेडे यांचे निवासस्थान व स्टेशनरोडवरील भाजपा कार्यालय येथून हालत आहे.तर कॉँग्रेसतर्फे निवडणुकी संदर्भातील राजकीय रणनिती व धोरणात्मक निर्णय हे प्रा. सुरेश देसले यांच्या शिवाजी चौकातील निवासस्थानी चर्चा करून घेतले जात आहेत. शिवाजी चौकातच शिवसेना पक्षाचे कार्यालय आहे.शिवसेनेचे उमेदवार व कार्यकर्ते पक्ष कार्यालयात येऊन त्यांची निवडणुकीतील रणनिती ठरवत आहेत. तर समाजवादी पार्टीच्या राजकीय हालचाली या विजयसिंग राजपूत यांच्या रथगल्ली येथील निवासस्थानी चर्चा केल्यानंतर गतिमान होत असल्याचे एकंदरीत शिंदखेडा शहरात चित्र दिसून ये

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिंदखेडा तालुक्याची दुष्काळी तालुका अशी पूर्वापार ओळख आहे. ही ओळख अजूनही पुसली गेलेली नाही. शिंदखेडा शहरापुरता विचार केला तर येथील ग्रामपंचायत ते नगरपंचायतीत आजपर्यंत ज्यांनी सत्तेचा उपभोग घेतला; त्यांनाही शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावता आलेला नाही. येवढेच नव्हे तर स्वातंत्र्यानंतर येथील राजकारण्यांचे राजकारण हे केवळ पाण्याभोवतीच फिरत राहिले; असे येथील जाणकार सांगतात. आता तर सत्ता द्या, पाणी पुरवठा योजना मार्गी लावूनच दाखवू, असे जनतेला आश्वासित केले जात असल्याचा प्रयत्न शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत रिंगणात असलेल्या प्रमुख पक्षांच्या नेतेमंडळींकडून दिला जातो आहे. 
त्यामुळेच भाजपात केला प्रवेश 
भाजपात प्रवेश करणारे अनिल वानखेडे यांनी कॉँग्रेस व देसले गटातील गटबाजीला कंटाळून भाजपात प्रवेश करण्याचे सांगितले आहे. तसेच त्यांचे भाजपात येण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे भाजपात मंत्री जयकुमार रावल यांनी  पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणू,असा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला आणि प्रत्यक्षात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळेच भाजपात ते आले आहे. 
 

पाणीपुरवठा योजनेसाठी दिली लोकवर्गणी 
कॉँग्रेसचे प्रा. सुरेश देसले म्हणाले, की गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ता मिळाली. त्यानंतर पाच वर्षात शहर विकासासाठी  ६० टक्के काम के ल्याचा दावा त्यांनी केला आहे. पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्यानंतर त्यासाठी शासनाने ५ टक्के लोकवर्गणीची अट घातली होती. त्यानुसार शिंदखेडा नगरपंचायतीला १३ व १४ व्या वित्त आयोगाचा मिळालेल्या निधीचे पैसे हे लोकवर्गणीसाठी दिले होते. त्यामुळे काही कामे ही राहून गेली, असे प्रा. देसले यांनी म्हटले आहे.  मात्र, येत्या निवडणुकीत सत्ता मिळाल्यास विकासाचा अनुशेष भरून काढणार असल्याचे ते म्हणाले आहे. 
 

शिवसेना १ डिसेंबरला जाहीर करणार जाहीरनामा 
शिंदखेडा नगरपंचायतीत शिवसेनेनेही १२ उमेदवार व १ नगराध्यक्षपदाचे उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या प्रचाराची धूरा जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्यावर असून शिवसेना पक्षाचा जाहीरनामा १ डिसेंबरला प्रसिद्ध करणार असल्याची माहिती साळुंखे यांनी दिली आहे. परंतु, जाहीनाम्यावर  पाणी प्रश्न हा मुख्य मुद्दा राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
 

समाजवादी पार्टीतर्फे दिला जातोय विकासाचा नारा 
शिंदखेडा नगरपंचायतीत समाजवादी पार्टीतर्फे विकासाचा नारा दिला जातो आहे. स.पा.चे उमेदवार मतदारांना रस्ते, पाण्याचा निचरा व इतर विकासात्मक कामे करणार असल्याचे आश्वासन देत आहेत; तर या निवडणुकीत स.पा.ने १७ उमेदवार रिंगणात उतरविले आहे.
 त्यापैकी १० जागा व १ नगराध्यक्षपदी आमचा उमेदवारच निवडून येईल, असा विश्वास समाजवादी पार्टीचे विजय नथेसिंह राजपूत यांनी व्यक्त केला  आहे. 

जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू; गृहभेटीदरम्यान ‘पाणी पे’ चर्चा

शिंदखेडा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शहराचा बिकट पाणी प्रश्न विचारात घेता, शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून २१ कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. सद्य:स्थितीत या योजनेंतर्गत शिंदखेडा शहरापासून ९ कि.मी. अंततरावर सुकवद येथील तापी नदीचे पात्रातून जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भाजपाचे अनिल वानखेडे हे सत्ता आल्यानंतर ही योजना प्राधान्याने पूर्ण करणार असल्याचे प्रचारादरम्यान सांगताना दिसत आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे आता विविध पक्षांचे उमेदवार हे गृहभेटींवर अधिक लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत. उमेदवार प्रचारासाठी मतदारांच्या घरी गेल्यानंतर केवळ ‘पाणी पे’ चर्चा अधिक रंगत आहे. मतदार उमेदवारांना या निवडणुकीनंतर तरी शहराचा पाणी प्रश्न हा कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी विनंती करताना दिसत आहे. मतदारांना उत्तर देताना  ‘फक्त सत्ता द्या, हा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही, असे सांगताना दिसत आहे. 

Web Title: After independence, Shindkhed's politics wandered around the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.