तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी डाॅ. सुभाष बोरसे यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवपदी पदोन्नती झाल्याने, जिल्हा परिषदेने त्यांना १६ डिसेंबर २०२० रोजी कार्यमुक्त केले होते. त्यानंतर काही दिवस निरंतर शिक्षण मंडळाच्या शिक्षणाधिकारी, त्यानंतर प्राथमिकचे शिक्षणाधिकाऱ्यांकडे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार सोपविण्यात आला.
दरम्यान, माध्यमिक विभागासाठी पूर्णवेळ शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी शिक्षणक्षेत्रातून मागणी होत होती. अखेर शिक्षण आयुक्तांनी
१ फेब्रुवारी २१ रोजी नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी व्ही. डी. झनकर यांच्याकडे धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याचे आदेश दिले होते. झनकर आठवड्यातून एक-दोन दिवसच धुळ्यात यायच्या. दरम्यान, कौटुंबिक कारणास्तव त्यांनी रिक्तपदाचा अतिरिक्त पदभार सांभाळणे कठीण होत असल्याचे कळविले होते. त्यामुळे त्यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढण्यात आला. आता धुळ्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार औरंगाबादचे माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याचे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी ३१ मे रोजी काढले आहेत. आता औरंगाबादचे शिक्षणाधिकारी धुळ्याला कितपत न्याय देतात हे येत्या काही दिवसांत समजू शकेल.