गोल्ड फॅक्टरीच्या उद्घाटनाला आले होते सिनेअभिनेता दिलीपकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:24 IST2021-07-08T04:24:16+5:302021-07-08T04:24:16+5:30
मोठ्या धाडसाने कोणतीही अनुकूलता नसताना सोने शुद्धीकरणाचा हा उद्योग शिरपूरसारख्या ग्रामीण भागात येणे म्हणजे मोठमोठ्या उद्योगपतींना धक्कादायक होते़ ...

गोल्ड फॅक्टरीच्या उद्घाटनाला आले होते सिनेअभिनेता दिलीपकुमार
मोठ्या धाडसाने कोणतीही अनुकूलता नसताना सोने शुद्धीकरणाचा हा उद्योग शिरपूरसारख्या ग्रामीण भागात येणे म्हणजे मोठमोठ्या उद्योगपतींना धक्कादायक होते़ हा प्रकल्प मुकेशभाई पटेल यांच्या भागीदार मित्रांनी कोकणात सुरू करण्याचा आग्रह केला, पण प्रस्तुत प्रकल्प शिरपूरलाच होईल, असा ठाम निर्धार खासदार मुकेशभाई पटेल यांनी केला होता आणि त्याप्रमाणे घडलेही़ एवढेच नव्हे तर या प्रकल्पाचे सुरुवातीचे नाव ‘द गोल्ड रिफायनरी’ असे होते़ परंतु, स्वत:च्या कर्मभूमीचे नाव या प्रकल्पाला देण्याचे ठरवून त्याप्रमाणे बदलही घडविला व ‘शिरपूर गोल्ड रिफायनरी’ या नावाने हा प्रकल्प सुरू झाला़ जगातल्या नकाशात शिरपूर या उद्योगामुळे झळकले़ सुमारे ३०० कोटींचा हा प्रकल्प या शहराजवळून जाणा-या मुंबई-आग्रा या महामार्ग क्रमांक तीनवर आहे़ हा प्रकल्प ६० एकर जागेवर उभा असून सध्या त्याठिकाणी १८ व २२ कॅरेट सोन्याचे रूपांतर शुद्धीकरण करून २४ कॅरेटमध्ये केले जात होते़ तसेच २४ कॅरेट सोन्याचे रूपांतर ऑर्डरप्रमाणे १८ व २२ कॅरेटमध्ये केले जात होते़ रॉ मटेरियल्स मुंबई येथून आणले जात होते़
या गोल्ड फॅक्टरीचा उद्घाटन कार्यक्रम २६ मार्च २००१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी कृषीमंत्री शरद पवार, यशवंतराव सिन्हा, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, सुशीलकुमार शिंदे, सुरेशदादा जैन, अरुणभाई गुजराथी, प्रफुल्लभाई पटेल, आमदार अमरिशभाई पटेल, शिवाजीराव पाटील, स्वरूपसिंग नाईक, माणिकराव गावित, सिनेअभिनेता सुनील दत्त, सुभाष गोयल आदींच्या उपस्थितीत डोळ्यांचे पारणे फेडणारा कार्यक्रम होता़
त्या कार्यक्रमात विशेष उपस्थिती सिनेअभिनेता दिलीपकुमार यांची लागली होती़ तत्पूर्वी, दिलीपकुमार सन १९९५ मध्ये आमदार अमरिशभाई पटेल यांच्या प्रचारसभेला शिरपुरात आले होते़