वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 19:41 IST2020-12-07T19:41:05+5:302020-12-07T19:41:26+5:30
शहर आणि वाहतूक शाखेची संयुक्त मोहीम, १४ जणांवर गुन्हा

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्यांवर कारवाई
धुळे : वर्दळीच्या रस्त्यावर अतिक्रमण करीत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्यांवर सोमवारी सकाळी मोहीम राबवून कारवाई करण्यात आली.
तहसीलदार कार्यालय ते बारापत्थर चौकादरम्यान असलेल्या काही व्यावसायिकांवर हटविल्यामुळे रस्ता पूर्णपणे मोकळा झाला. ही मोहीम शहर आणि वाहतूक शाखेने संयुक्तपणे राबविली. शहरातील तहसीलदार कार्यालय ते बारापत्थर चौक या दरम्यान वाहतुकीची कोंडी हा नित्याचाच विषय झाला आहे. काही दिवसांपुर्वी याच भागात दुचाकी लावण्यावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी देखील झाली होती. तणाव निर्माण झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त लावण्याची वेळ आली होती. परिणामी काही दिवस या ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरु होती. रस्ताही मोठा झाला होता. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून याच ठिकाणी पुन्हा वाहतुकीची कोंडी झाल्याचे समोर आले होते. या ठिकाणी पुन्हा अनर्थ घटना घडू नये यासाठी सोमवारी सकाळी मोहीम राबविण्यात आली. त्यात रस्त्यावरील सर्व अतिक्रमण हटविण्यात आले. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाºया गॅरेज आणि कुशन दुकानदार अशा १४ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.