शिरपूरचे हॅास्पिटल कोविडसाठी अधिग्रहित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:37 IST2021-04-09T04:37:57+5:302021-04-09T04:37:57+5:30
डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी संजय यादव यांना नुकतेच निवेदन दिले. त्या निवेदनात, तालुक्यात कोरोनाचा संसर्ग ...

शिरपूरचे हॅास्पिटल कोविडसाठी अधिग्रहित करा
डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी संजय यादव यांना नुकतेच निवेदन दिले. त्या निवेदनात, तालुक्यात कोरोनाचा संसर्ग टोकाला पोंहचल्यामुळे गंभीर रुग्णांची संख्या वाढली आहे. शिरपूर उपजिल्हा रुग्णालय व खाजगी कोविड सेंटर्समधील बेड अपुरे पडत असून आॅक्सिजन व व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांना बाहेरगावी पाठवणे भाग पडते. त्यात वेळीच उपचार न मिळाल्याने काही जणांचा मृत्यू झाला असून बळींची संख्या आणखी वाढण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेचे इंदिरा गांधी हॉस्पिटल कोरोना रुग्णांसाठी अधिग्रहित केल्यास मोठी सुविधा उपलब्ध होऊ शकेल. या रुग्णालयात आॅक्सिजन प्लांट, सुसज्ज इमारत, बेड्स आणि तज्ञ वैद्यकीय अधिकारी अशा उपयुक्त सुविधा आधीच उपलब्ध आहेत. शहरातील अन्य खाजगी तज्ञ डॉक्टर्सचे सहकार्य घेऊन रुग्णालयात सुसज्ज आयसीयू उभारता येईल. तेथे व्हेंटिलेटरसारखी सुविधा दिल्यास रुग्णांच्या वाहतुकीत खर्च होणारा बहुमूल्य वेळ वाचवता येणार असून अनेकांचे जीव वाचवणे शक्य होणार आहे. त्याशिवाय नगरपालिका रुग्णालय महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत असल्यामुळे गरजू रुग्णांचीही मोठी सोय होणार आहे. त्यामुळे सदर रुग्णालय युद्धपातळीवर अधिग्रहित करून शिरपूरकरांच्या सेवेत रुजू करावे अशी मागणी डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी निवेदनातून केली आहे.