शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 22:35 IST2020-12-17T22:35:27+5:302020-12-17T22:35:51+5:30
वंचित बहुजन आघाडीची धुळ्यात निदर्शने

dhule
धुळे : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन केले. शेतकरी विरोधी कायदे रद्द करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी करीत धुळ्यात निदर्शन करण्यात आली. पक्षाचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. धुळे येथे क्युमाइन क्लबजवळ वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. त्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, संसदेने केलेले शेतीविषयक कायदे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहेत. त्यामुळे तीनही कायदे रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी देशपातळीवर लावून धरली आहे. किमान आधारभूत किंमत देण्यात खासगी व्यापारी प्रामाणिक राहणार नाही. त्यामुळे याबाबत कायद्यात स्पष्ट तरतूद करावी ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या तीनही घटक पक्षांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. परंतु केवळ पाठिंबा न देता राज्याच्या विधीमंडळात शेतकरी हिताचे कायदे करावेत, अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. अन्यथा महाराष्ट्र सरकारची दुटप्पी भूमिका असल्याचे आरोप होऊ शकतात. त्यातून सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण होईल. राज्य शासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
आंदोलनात राज चव्हाण, डाॅ. अजय माळी, भय्या पारेराव, शंकर खरात, ॲड. चक्षुपाल बोरसे, योगेश जगताप, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढतच आहे.