वडजाई परिसरात खरीपपूर्व हंगामाच्या कामांना गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:34 IST2021-05-17T04:34:35+5:302021-05-17T04:34:35+5:30
यावर्षी हवामान खात्याचा अंदाजनुसार पावसाळा वेळेवर सुरू होणार असल्याचे अंदाज दिल्याने वडजाई सौंदाणे परिसरातील शेतकरी वर्गाने खरीप पूर्व ...

वडजाई परिसरात खरीपपूर्व हंगामाच्या कामांना गती
यावर्षी हवामान खात्याचा अंदाजनुसार पावसाळा वेळेवर सुरू होणार असल्याचे अंदाज दिल्याने वडजाई सौंदाणे परिसरातील शेतकरी वर्गाने खरीप पूर्व मशागतीला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी समाधानकारक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना रब्बी व खरीप हंगाम घेता आला. परंतु मालाला भाव नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती. रब्बी हंगामात उत्पन्न बऱ्यापैकी असताना बेमोसमी वादळी वाऱ्याने उभे पीक आडवे केले होते. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट शेतकऱ्यांना सहन करावी लागली होती. त्याची भर आता खरीप हंगामात निघेल. निसर्ग साथ देईल या आशेने शेती मशागत करण्याच्या कामांना वेग आला आहे. यावर्षी शेती कामांसाठी मजूर व सालदार मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी बैलजोडीद्वारे मशागत करताना दिसून येत नाही. बोटावर मोजण्याइतक्या थोड्याफार शेतकऱ्यांकडे सालदार आढळून येतात ते शेतकरी नागरणी वखरणी मागणी सरदाराला मार्फत करून घेतात, परंतु बहुतांश शेतकरी आता ट्रॅक्टर गॅरेज मशागती करून घेताना दिसून येत आहे. तसेच यावर्षी रासायनिक खतांपेक्षा शेणखत वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे जमिनीची पोत सुधारण्यासाठी शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. डिझेलचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे रोटा करणे नांगरणे करण्याच्या भावातही वाढ झाली आहे. रोटा मारायचा असेल, तर १२०० रुपये एकर या भावाने भाव सुरू आहेत. तर नांगरणीचे १४०० रुपये कर भाव ट्रॅक्टरचे सुरू आहेत. मशागतीसाठी ट्रॅक्टरचा वापर होताना दिसून येत आहे कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. यावर्षी बियाणाचे खतांचे भाव गगनाला भिडलेले आहेत, तर शासनाकडून पीककर्ज मिळण्यास विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, असे असतानादेखील यावर्षी नवीन उमेद घेऊन तो मोठ्या आशेने व पूर्ण ताकदीने कामाला लागला आहे पैशांची जमवाजमव करून व उसनवारीने घेऊन तो मशागती सह बी-बियाणे खरेदी करण्याच्या योजना आखत आहे. तूर्तास तरी मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त दिसून येत आहे.