उद्दिष्टयापैकी ४० टक्के नागरिकांनी घेतला दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:42 IST2021-09-24T04:42:06+5:302021-09-24T04:42:06+5:30

भूषण चिंचोरे धुळे - जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाने गती घेतली आहे. दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली असून आरोग्य ...

About 40 per cent of the target population took the second dose | उद्दिष्टयापैकी ४० टक्के नागरिकांनी घेतला दुसरा डोस

उद्दिष्टयापैकी ४० टक्के नागरिकांनी घेतला दुसरा डोस

भूषण चिंचोरे

धुळे - जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाने गती घेतली आहे. दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली असून आरोग्य विभागाने डोळ्यासमोर ठेवलेल्या उद्दिष्टयापैकी ४० टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे कोरोना विरुद्ध सुरु असलेल्या लढ्याला बळकटी मिळाली आहे.

कोविशील्ड व कॅव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे डोस मुबलक प्रमाणात प्राप्त होत असल्याने लसीकरणाचे सत्र वाढवण्यात आले आहेत. आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये नियमित लसीकरण सत्र घेतली जात आहेत. लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर पर्याप्त डोस उपलब्ध होत असल्याने लसीकरण केंद्र बंद करावे लागत होते. आता मात्र दोन्ही लसींचे डोस प्राप्त होत असल्याने लसीकरणाची गती वाढली आहे.

एका दिवसात १५५ ठिकाणी लसीकरण -

धुळे शहरातील आरोग्य केंद्रांसोबतच ग्रामीण भागातही लसीकरण सत्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. एका दिवसात १०० सत्रे राबवण्याचे लक्ष्य शासनाने आरोग्य प्रशासनाला दिले आहे. परंतू एका दिवसात १५० ते १५५ ठिकाणी लसीकरण मोहीम राबवत असल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी दिली.

महिनाभरात होणार ६० टक्के नागरिकांचे लसीकरण -

जिल्ह्यातील १७ लाख १० हजार ९०० जणांना पहिला तर ७ लाख ७२ हजार ९९२ जणांना दोन्ही डोस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ४५ टक्के नागरिकांनी पहिला तर ४० टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. हर्ड इम्युनिटी निर्माण व्हावी यासाठी ६० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करावे अशी सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली आहे. येत्या महिनाभरात प्राप्त लक्ष्यापैकी ६० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणार असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

तरुणांचा टक्का कमीच -

लसीकरणाची गती वाढली असली तरी लस घेणाऱ्या नागरिकांमध्ये तरुणांची संख्या कमी आहे. आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ३४ टक्के नागरिकांनी पहिला तर २० टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणात तरुणांपेक्षा जेष्ठांची संख्या अधिक आहे. ६० पेक्षा अधिक वयाच्या ५५ टक्के नागरिकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे लस घेण्यासाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे.

६० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. लसीकरण सत्रे वाढवून लक्ष्य गाठणार आहोत. त्यादृष्टीने नियोजन सुरु केले आहे.

- डॉ. प्रसन्ना कुलकर्णी,

जिल्हा लसीकरण अधिकारी

ग्राफ साठी

उद्दिष्ट्य

पहिला डोस - १७१०९००

उद्दिष्ट्य प्राप्ती - ७७२९९२

४५.१८ टक्के

उद्दिष्ट्य

दुसरा डोस - ७७२९९२

उद्दिष्ट्य प्राप्ती - ३०४२४८

४० टक्के

Web Title: About 40 per cent of the target population took the second dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.