डिझेल टँकर उलटल्याने तब्बल १२ हजार लिटर डिझेल मातीमोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 17:09 IST2023-03-10T17:08:54+5:302023-03-10T17:09:05+5:30
धुळे तालुक्यातील अजनाळे व चौगावदरम्यान बारीत समोरील येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात डिझेल टॅंकर उलटला.

डिझेल टँकर उलटल्याने तब्बल १२ हजार लिटर डिझेल मातीमोल
धुळे : मालेगावकडून कुसुंबामार्गे नवापूर येथे जात असलेला डिझेल टँकर शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अजनाळे बारीत उलटला. टँकर उलटल्याने, तब्बल १२ हजार लिटर डिझेल मातीत मिसळले.
मनमाडहून शुक्रवारी पहाटे निघालेला भारत पेट्रोलियम कंपनीचा डिझेल टँकर (क्रमांक एम एच ४१, ए यू ४२८३) नवापूर येथे मालेगाव कुसुंबामार्गे जात होता. धुळे तालुक्यातील अजनाळे व चौगावदरम्यान बारीत समोरील येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात डिझेल टॅंकर उलटला. डिझेल टँकरमध्ये १२ हजार लिटर डिझेल होते. टँकर खाली आदळल्याने टँकरला गळती लागली. यात भरमसाठ डिझेल वाहून गेले. दुर्घटना होऊ नये. या पार्श्वभूमीवर कुसुंबा व अजनाळे फाट्याजवळ वाहतूक काही वेळ थांबवण्यात आली होती. टॅंकर उभा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विजया पवार यांच्यासह धुळे व पिंपळनेर पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.