धुळ्यात गावठी पिस्तूलसह तरुणाला सापळा लावून पकडले, 41 हजारांचा मुद्देमाल जप्त
By देवेंद्र पाठक | Updated: September 11, 2023 16:30 IST2023-09-11T16:30:06+5:302023-09-11T16:30:40+5:30
साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरात एक तरुण गावठी पिस्तूल जवळ बाळगून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली.

धुळ्यात गावठी पिस्तूलसह तरुणाला सापळा लावून पकडले, 41 हजारांचा मुद्देमाल जप्त
धुळे : दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या करण जगन शिंदे (२६) या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून पकडले. ही कारवाई साक्री तालुक्यातील निजामपूर बसस्थानक परिसरात सोमवारी सकाळी करण्यात आली. त्याच्याकडून ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरात एक तरुण गावठी पिस्तूल जवळ बाळगून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच पथकाला रवाना करण्यात आले. निजामपूर बसस्थानकाच्या परिसरात करण शिंदे हा तरुण संशयितरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि १ हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस असा एकूण ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस कर्मचारी गुणवंत पाटील याच्या फिर्यादीवरून संशयित करण जगन शिंदे (२६, रा. निजामपूर, ता. साक्री) याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल झाला. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, कर्मचारी मच्छिंद्र पाटील, नीलेश पोतदार, सुशील शेंडे, गुणवंत पाटील यांनी कारवाई केली.