रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, महिला दूरवर फेकली गेली; देवपुरातील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: February 12, 2024 18:36 IST2024-02-12T18:34:10+5:302024-02-12T18:36:05+5:30
रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीची धडक बसल्याने महिलेला गंभीर दुखापत झाली.

रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, महिला दूरवर फेकली गेली; देवपुरातील घटना
धुळे: रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीची धडक बसल्याने महिलेला गंभीर दुखापत झाली. ही घटना देवपुरातील धनदाई हॉस्पिटलसमोर शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी रविवारी देवपूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. देवपुरातील बिलाडी रोडवरील द्वारका नगरात सुनीता राजेंद्र पाटील (वय ५१) यांचे वास्तव्य आहे. काही कामानिमित्त देवपुरात त्या आलेल्या होत्या. देवपुरातील धनदाई हॉस्पिटलजवळ शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्या रस्ता ओलांडत होत्या. त्याच वेळेस एमएच १८ बीयू ४७८८ क्रमांकाची दुचाकी भरधाव वेगाने आली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीची महिलेला धडक बसली. धडक इतकी जोरात बसली की सुनीता या दूरवर फेकल्या गेल्या.
त्यांना डोक्यासह हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातास जबाबदार असणारा दुचाकीचालक घटनास्थळावरून पसार झाला होता. अपघातानंतर तातडीने सुनीता पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जखमी सुनीता यांची मुलगी प्रतिभा राजेंद्र पाटील (वय २३) यांनी देवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, फरार दुचाकीचालक विरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक बी. बी. बागुल घटनेचा तपास करीत आहेत.