भरधाव ट्रॅक्टरने तरुणाला उडविले; शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: April 2, 2023 17:53 IST2023-04-02T17:52:58+5:302023-04-02T17:53:18+5:30
भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने शेतात तरुणाला जोरदार धडक दिली.

भरधाव ट्रॅक्टरने तरुणाला उडविले; शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील घटना
धुळे : भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरने शेतात तरुणाला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शिरपूर तालुक्यातील बभळाज शिवारात शुक्रवारी रात्री घडली. ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल झाला. शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील शिवारात सुनील पांडुरंग पाटले (वय ३७) यांचे शेत आहे. या शेतात कृष्णा जयसिंग भिल हा २० वर्षाचा तरुण काहीतरी काम करत होता.
शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास एमएच १८ बीएक्स ३८२३ क्रमांकाचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने शेतात दाखल झाले. अंधार असल्यामुळे तरुण शेतात आहे हे चालकाच्या लक्षात न आल्याने हे ट्रॅक्टर थेट तरुणाच्या अंगावर गेल्याने कृष्णा भिल हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला आणि अन्य ठिकाणी दुखापत झाल्याने तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार करत असताना तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सुनील पाटले यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, मोटारवाहन कायदा कलम १८४ प्रमाणे थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस नाईक रामोळे घटनेचा तपास करीत आहे.