धुळे जिल्ह्यातील १२५९ विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 13:31 IST2020-02-13T13:31:42+5:302020-02-13T13:31:59+5:30
आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश: यावर्षी शाळा व जागांमध्ये वाढ

धुळे जिल्ह्यातील १२५९ विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश
आॅनलाइन लोकमत
धुळे : आरटीई अंतर्गत वंचीत व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. त्यानुसार आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया १३ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील १०३ शाळांमध्ये १ हजार २५९ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून देण्यात आली.
जिल्ह्यात २०१३-१४ पासून आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया १३ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. आॅनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत १९ फेब्रुवारीपर्यंत असल्याची माहिती आरटीईच्या वेबसाईटवर दिलेली आहे.
त्यानंतर मार्च-एप्रिल महिन्यात लॉटरी पद्धतीने मेरीट काढण्यात येईल. पालकांना प्रवेश नोंदणी करतांना एक किलोमीटर, तीन किलोमीटर, व त्यापेक्षा अधिक अंतरातील केवळ १० शाळा निवडता येतील. परंतु प्रवेश एकाच शाळेत मिळणार आहे. आॅनलाईन नोंदणी करतांना पालकांनी उत्पन्नाच्या दाखल्यामधील बारकोड अर्जात नमूद करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याला आॅनलाईन प्रवेश मिळाल्यानंतर तसा एसएमएस शाळा व पालकांना पाठविण्यात येणारआहे. सबळ कारणाशिवाय कोणत्याही शाळेला प्रवेश नाकारता येणार नाही. प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल असा इशारा शिक्षण विभागाने दिलेला आहे.
१०३ शाळांमध्ये प्रवेश
जिल्ह्यातील १०३ शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश मोफत देण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी १०१३ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला होता. यावेळी १२५९ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
यावर्षी शाळांची व जागांची
संख्या वाढली
आरटीई प्रवेश अंतर्गत यावर्षी सहा शाळांची नव्याने भर पडलेली असून २२ जागा वाढल्या आहेत.गेल्यावर्षी फक्त ९७ शाळा होत्या. तर यावर्षी १०३ शाळांमध्ये हे प्रवेश दिले जातील. दरम्यान शहरातील नामांकित शाळांमध्येच आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी पालकांची धडपड सुरू आहे.