जिल्हा कारागृहात 80 टक्के तरुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 21:45 IST2020-12-19T21:43:49+5:302020-12-19T21:45:06+5:30
तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात

dhule
धुळे : जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये तरुणाईचा भरणा अधिक आहे. सध्या शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांपैकी ८० टक्के कैदी हे तरुण आहेत. तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. तरुण वयातील जोश गुन्हेगारी मार्गात वाया जात आहे.
जिल्हा कारागृहात एकूण ३२५ कैदी शिक्षा भोगत आहेत. यात १८ ते २५ वयोगटातील ४० कैद्यांचा समावेश आहे. २५ ते ४० या वयोगटातील सर्वाधिक कैदी धुळे जिल्हा कारागृहात आहेत. २५ ते ४० या वयोगटातील तब्बल २६३ कैदी आहेत, तर त्यापेक्षा अधिक वयाचे २२ कैदी सध्या शिक्षा तुरुंगवास कंठत आहेत. महिला कैदीही कारागृहात आहेत. २३ महिला कैदी सध्या तुरुंगवासात आहेत.
गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतात दररोज नवनवीन घटना खळबळ माजवत आहेत. चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र धुळे शहरात काही दिवसांपासून सुरू आहे. एटीएम फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. मागील आठवड्यात तर एकाच दिवसात तीन एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. सुदैवाने चोरट्यांचा तो प्रयत्न फसला होता. त्या गुन्ह्यातील चोरटे अजूनही सापडलेले नाहीत. जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांतील अनेक आरोपी अजूनही पसार आहेत, तर काहींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. त्यापैकी काही कैदी सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. अलीकडे जिल्ह्यात गांजा पकडण्याच्या अनेक कारवाया पोलिसांनी केल्या आहेत. गांजा, चरस आदी गुन्ह्यातील १४ कैदी कारागृहात आहेत. खुनाच्या गुन्ह्यातील सर्वाधिक कैदी कारागृहात आहेत. खुनाच्या गुन्ह्यातील तब्बल १३० कैदी आहेत. बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींची संख्या कमी आहे. दरम्यान, तुरुंगातील काही कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता मात्र सर्व कैदी कोरोनामुक्त झाले असून, तुरुंग कोरोनामुक्त असल्याचे तुरुंग अधीक्षक डी. जी. गावडे यांनी सांगितले. कोरोनामुळे कैद्यांच्या त्यांच्या परिवाराशी होणाऱ्या मुलाखती बंद आहेत, मात्र व्हिडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात ऑनलाईन पध्दतीने फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच एटीएमच्या बाहेर उभे राहून वृध्द व्यक्ती पैसे काढण्यासाठी आल्यास एटीएम कार्ड अदला बदल करून खात्यातून पैसे काढण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याबाबत पोलीसाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.