धुळे जिल्ह्यात शाळा दुरूस्तीसाठी १.८० कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:17 IST2019-11-06T11:17:09+5:302019-11-06T11:17:28+5:30
जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळाला निधी, प्राधान्यक्रमानुसार दुरूस्तीचे कामे होणार

धुळे जिल्ह्यात शाळा दुरूस्तीसाठी १.८० कोटी मंजूर
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांचे छत गळके असून, काही शाळांच्या वर्ग खोल्यानां तडेही गेलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणेही कठीण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून १ कोटी ८० लाखांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी दिली.
धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार १०४ शाळा असून, त्यात पहिली ते पाचवीपर्यंत ८८ हजार १४ व सहावी ते आठवीपर्यंत २ हजार ५३६ असे एकूण ९० हजार ५५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
जिल्ह्यातील सर्व शाळा डिजीटल झालेल्या आहेत. विशेष म्हणजे सर्वच शाळांच्या भौतिक सुविधांकडे लक्ष देण्यात आलेले आहे. असे असले तरी काही शाळांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. आजच्या स्थितीत जिल्हा परिषद शाळांच्या ११२ वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत असल्याने, त्याचा वापरच बंद करण्यात आलेला आहे.
दरम्यान जिल्ह्यातील काही शाळांचे छत गळके झालेले आहेत. यावर्षी झालेल्या पावसाळ्यात अशा गळक्या वर्ग खोल्यांमध्ये बसतांना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागली होती. खोल्या गळक्या असल्याने काही ठिकाणी दोन वर्गातील विद्यार्थी एकाच वर्गात बसविण्यात आले होते.
तसेच काही शाळांच्या खोल्यांना मोठ-मोठे तडे गेले आहेत. काही शाळांमधील खालचे फ्लोरिंग (फरशी) खराब झाले आहे. अशा अवस्थेत ग्रामीण भागातील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहे.
जिल्हा परिषद शाळांच्या दयनीय अवस्थेबद्दल ‘लोकमत’ने शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी वृत्त प्रसिद्ध केले होते.
दरम्यान शिक्षण विभागानेही शाळा खोल्या दुरूस्तीसाठी निधीचा पाठपुरावा केला होता. शाळा दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे ३ कोटी रूपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र जिल्हा नियोजन मंडळाकडून १ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर झालेला आहे.
या मंजूर झालेल्या निधीतून सर्व प्रथम ज्या शाळांचे छत गळके आहे, त्याची दुरूस्ती केली जाईल. तडे बुजविण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची चांगली सोय व्हावी यासाठी फ्लोरिंगचे काम केले जाणार आहे. सर्व कामे प्राधान्यक्रमाने करण्यात येणार असून, त्यांना लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.