लसींचा स्टाॅक नसल्याने ६६ केंद्रे बंद; १ मेपासून काय होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:36 IST2021-04-27T04:36:44+5:302021-04-27T04:36:44+5:30
धुळे : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा स्टाॅक नसल्याने १४६ पैकी ६६ लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ आरोग्य विभागावर आली ...

लसींचा स्टाॅक नसल्याने ६६ केंद्रे बंद; १ मेपासून काय होणार?
धुळे : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा स्टाॅक नसल्याने १४६ पैकी ६६ लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे. त्यामुळे १ मेपासून काय होणार, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. परंतु, शासनाकडून पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा होत नसल्याने प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा तरी काय करणार, असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा गेल्या वर्षभरापासून गुरफटली आहे. कोरोनाच्या महामारीतून एकदाची सुटका व्हावी म्हणून लसीकरणातही यंत्रणेने स्वत:ला झोकून दिले आहे. शहरासह जिल्ह्यात एकूण १४६ लसीकरण केंद्रे सुरू केली होते. पंरतु, शासनाकडून पुरेशा प्रमाणात लस न मिळाल्यामुळे ६६ लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. त्यामुळे जिल्ह्याचा लसीकरणाचा वेग कमालीचा मंदावला आहे.
जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रशासनाचे प्रामाणिक प्रयत्न असून, त्यादृष्टीने तयारी देखील केली आहे. परंतु, लसींच्या बाबतीत जिल्ह्याच्या औषधालयात ठणठणाट असल्याने १ मेपासून काय होणार, असा प्रश्न आरोग्य विभागाला पडला आहे.
१ मे नंतरचे नियोजन काय?
४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण गेल्या तीन महिन्यांत केवळ २० टक्के झाले आहे. शासनाकडून आवश्यकतेप्रमाणे लसींचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यात लसीकरणाचे नियोजन कोलमडले आहे.
सध्या लसीकरण सुरू असलेल्या वयोगटासह १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन आरोग्य विभागासह प्रशासनाने केले आहे. लसीकरण केंद्रांची संख्या वाढविली जाणार आहे. आवश्यकतेप्रमाणे कर्मचारीवर्ग देखील उपलब्ध आहे.
परंतु, लसींची उपलब्धता होत नसल्याची प्रशासनापुढे सर्वांत मोठी अडचण आहे. लसींचा साठा संपल्याने सध्या अनेक केंद्रे बंद करावी लागली आहेत. त्यात प्रशासन, आरोग्य विभागाचा दोष नाही.
धुळे जिल्ह्याचा लसीकरणाचा वेग अतिशय मंद आहे. गेल्या तीन महिन्यांपासून लसीकरण सुरू असले तरी केवळ २० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. २० ते २२ लाख लोकसंख्येला लसीकरण कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रशासनाने लसींची मागणी नोंदवली आहे. वेळोवेळी पाठपुरवा देखील केला जात आहे. परंतु, शासनाकडून लसींचा पुरवठा थांबल्याने लसीकरणाचा वेगदेखील मंदावला आहे. यात आरोग्य विभाग किंवा प्रशासनाला दोष देण्यात अर्थ नाही.
४५ वर्षांवरील जवळपास ८० टक्के नागरिकांचे लसीकरण राहिले आहे. १ मेपासून १८ ते ४५ च्या आतील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार असल्याने पुरेशा प्रमाणात लस मिळाव्यात यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
१ मेपासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार आहे. यासंदर्भात मंगळवारी शासनासोबत होणाऱ्या व्हीसीमध्ये मार्गदर्शक सूचना दिल्या जातील. त्यानुसार लसीकरणाचे सुयोग्य धोरण आखले जाईल. लसींचा पुरवठा कमी असला तरी धुळे जिल्ह्याला किती लसींची गरज आहे याची संपूर्ण माहिती शासनाला आधीच दिली आहे. जास्तीत जास्त लसींची मागणी नोंदविली आहे. गरजेनुसार लसीकरण केंद्रांची संख्या वाढविली जाईल. लसीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
- संजय यादव, जिल्हाधिकारी