२०१५ पासूनचा जप्त केलेला ५६७ किलो अंमली पदार्थ ‘मातीत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 17:34 IST2021-01-05T17:34:02+5:302021-01-05T17:34:25+5:30
धुळे जिल्हा पोलीस : १८ लाख ५७ हजाराचा होता मुद्देमाल

२०१५ पासूनचा जप्त केलेला ५६७ किलो अंमली पदार्थ ‘मातीत’
धुळे : जिल्ह्यातील वेगवेगळ्या ९ पोलीस ठाण्यात १६ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला ५६७ किलो ९८६ ग्रॅम वजनाचा गांजा आणि अफू सर्वोच्च न्यायालयाच्या निदेर्शानुसार मंगळवारी नष्ट करण्यात आला. हा मुद्देमाल १८ लाख ५७ हजार १३६ रुपये किंमतीचा होता. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित आणि अन्य अधिकारी यांच्या उपस्थितीत हा अंमली पदार्थांचा मुद्देमाल मातीत मोठा खड्डा करुन त्यात नष्ट करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. २०२० मध्ये धुळे जिल्हा पोलिसांनी ३५ गुन्ह्यांत ७ हजार ९३८ किलो वजनाचा ३ कोटी ८० लाख १३ हजार १३० रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. तर, २०१५ मध्ये जिल्हा पोलिसांनी १ हजार रुपये किंमतीचा ७३ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केला होता. त्यानंतर २०१६ मध्ये २ गुन्ह्यात ३ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा २५३ किलो ९०० ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले होते. २०१७ मध्ये ७ गुन्ह्यात १ हजार ५९ किलो ९४३ ग्रॅम वजनाचे ८ लाख ५३ हजार ६३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. २०१८ मध्ये ९ गुन्ह्यात १५ हजार १५ किलो ३९५ ग्रॅम वजनाचा १ कोटी २६ लाख ३४ हजार ४९० रुपये किंमतीचा अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. २०१९ मध्ये १४ गुन्ह्यांत ५ हजार ३५५ किलो ७४८ ग्रॅम वजनाचा ९२ लाख २९ हजार ४१७ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात जप्त केलेला अंमली पदार्थांचा मुद्देमाल मध्यवर्ती साठागृहात जप्त करण्यात आला होता. हा मुद्देमाल नष्ट करण्यापुर्वी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली. अंमली पदार्थ नष्ट करत असताना पर्यवरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेण्यात आली. मोठ्या आकाराचा खड्डा तयार करुन त्यात जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा मुद्देमाल पुरण्यात आला.
यावेळी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रभारी उपअधीक्षक प्रदीप पाडवी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आदी अधिकारी आणि पोलीस उपस्थित होते.