सुळे येथून ५२ हजारांचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:24 IST2021-07-01T04:24:50+5:302021-07-01T04:24:50+5:30
तालुक्यातील चिलारे येथील जिगर विनसिंग पावरा (२२) हा तरुण गांजा बियाण्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील ...

सुळे येथून ५२ हजारांचा गांजा जप्त
तालुक्यातील चिलारे येथील जिगर विनसिंग पावरा (२२) हा तरुण गांजा बियाण्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील सुळे शिवारातील तेल्यादेव पॉइंटजवळ येणार असल्याची गुप्त माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ यांना मिळाली.
त्यानुसार, सपोनि शिरसाठ, हवालदार लक्ष्मण गवळी, हेमंत पाटील, संजय देवरे, कुंदन पवार, श्यामसिंग पावरा, योगेश दाभाडे, योगेश मोरे, राजू गीते, इसरार फारुकी यांच्या पथकाने सापळा रचला़. काही वेळानंतर दुचाकी (क्र. एम़एच़१८-एई-१३२६) येताना दिसली़. दुचाकीस्वार जिगर पावरा याची चौकशी करीत असताना, गाडीच्या हँडलला लावलेल्या पिशवीची झडती घेतली असता, त्यात गांजा लागवडीसाठी लागणाऱ्या बियाण्याची पिशवी मिळून आली़. त्यास जेरबंद करून त्याच्याकडून ५२ हजार रुपयांचा ५ किलो ३५० ग्रॅम वजनाचे गांजा बियाणे व २० हजार रुपये किमतीची दुचाकी गाडी असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
संशयित आरोपीने गांजा सदृश्य अमली पदार्थाचे बीजबियाणे गैरकायदेशीर कब्ज्यात बाळगून दुचाकी गाडीने वाहतूक करीत असताना, रंगेहात मिळून आला़ आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोक़ॉ.श्यामसिंग पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिगर पावरा विरोधात एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.