उपाशीपोटी मजुरांची ३०० किमीची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 20:42 IST2020-03-29T20:41:37+5:302020-03-29T20:42:02+5:30
गावातही कोणी प्रवेश देत नव्हते : आंबे व धवली गावातील प्रत्येकी ६ कष्टकऱ्यांची आपबीती

उपाशीपोटी मजुरांची ३०० किमीची पायपीट
सुनील साळुंखे
शिरपूर : तालुक्यातील आंबे येथील सहा मजुर रोजगारानिमित्त नगर जिल्ह्यातील अरूणगाव येथे गेले होते. मात्र २४ मार्च रोजी देशात लॉकडाऊन झाल्याने, काम बंद झाले. अरूणगावहून गावी येण्यासाठी कुठलेही वाहन नसल्याने, त्यांनी चक्क दोन दिवस उपाशीपोटी जवळपास ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करून गाव गाठले. एवढे करुनही गावातही त्यांना कोणी घुसू देत नव्हते़ त्यांना गाववेशीजवळच १४ दिवस थांबण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे़ ही आपबिती कथन केली आहे आंबे येथील सहा मजुरांनी.
शिरपूर तालुक्यातील आदिवासी नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यातील कानाकोपºयात व शेजारील गुजरात राज्यात देखील मजुरीसाठी निघून जातात. यावर्षीही कित्येक मजूर बाहेरगावी गेलेत. कोरोनाच्या प्रभावाने नगर जिल्ह्यातून तीनशे किमीची उपाशीपोटी पायपीट करून आंबे येथील सहा मजूर घरी परतले. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील आंबे येथील सहा मजूर विजेचे खांब गाडण्याच्या कामासाठी नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अरूणगाव येथे कामाला गेले होते. दरम्यान कोरोना महामारीच्या विळख्यात कामच बंद पडले. काम नसल्याने त्यांची उपासमार सुरू झाली. त्याचवेळी ठेकेदारानेही त्यांना वाºयावर सोडले. शेवटी आंबे येथील सहा व मध्य प्रदेशातील धवली येथील सहा अशा बारा मजुरांनी पायीच घरी येण्याचा निर्णय घेतला. आणि तेथूनच सुरू झाली त्यांची नरकयातना.
पायी प्रवासा दरम्यान त्यांना कोणत्याही गावाने गावात येवू दिले नाही. त्यामुळे त्यांच्या जेवणाबरोबरच पाणी मिळणेही मुश्किल झाले. रात्री ओसाड शेतात तास - दोन तास आराम करून पायी प्रवास सुरूच ठेवला. केवळ बिस्कीटच्या सहाºयावर जवळपास तीनशे किमीची पायपीट करत अखेर सांगवी गाठले.
या मजुरांनी व्यक्त केली आपबीती
भारसिंग सरदार पावरा, बन्सीलाल नाना पावरा, सुमाºया नंदलाल पावरा, राधेशाम धरमसिंग पावरा, सुनिल नानला पावरा, कुमाºया गीला पावरा या मजुरांचा समावेश आहे़ आठ दिवसांपूर्वीच ते विजेचे खांब गाडण्याच्या कामासाठी नगरजिल्ह्यातील अरूणगाव पोहचले होते. जावून फक्त तीनच दिवस काम केल्यानंतर लगेच संचारबंदी लागली़ रात्री फक्त तास दोन तास झोपून दिवस रात्र एक करत ४ ते ५ दिवसांत पायी चालून त्यांनी घर गाठले. मार्गावरील गावात लोकांनी साधे पाणी पिण्यासाठी घुसू दिले नाही, त्यामुळे मार्गावर लागणारी शेत, वा मिळेल तिथे थांबून पाणी पीत होते़ जेवणाचे हाल झाले़ जेवण कुठेच मिळाले नाही त्यामुळे सोबत घेतलेले बिस्कीट खाऊन दिवस काढलेत अशी आपबिती त्यांनी कथन केली़ सांगवी गावाजवळ आल्यानंतर सरपंच मुकेश पावरा यांनी वाहनातून घरी सोडले़