संसाराचा ६० वर्षांचा जीवन प्रवास एकाच दिवशी संपला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:44 IST2019-12-26T12:43:33+5:302019-12-26T12:44:24+5:30
पतीनंतर पत्नीनेही घेतला ईहलोकीचा निरोप

संसाराचा ६० वर्षांचा जीवन प्रवास एकाच दिवशी संपला!
आॅनलाइन लोकमत
वारुड ता.शिंदखेडा (जि.धुळे) : अत्यवस्थ पत्नीमुळे चिंताग्रस्त असलेल्या ८३ वर्षीय वृद्धाचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या काही तासातच पत्नीचेही निधन झाल्याची घटना गुरुवारी धुळे येथे घडली.
एकत्र संसाराची सुरुवात करीत आपला ६० वर्षाचा जीवन प्रवास एकाच दिवशी संपवणारे शहापूर ता.अमळनेर येथील रहिवाशी पोपटराव भुताजी पाटील व नंदिनीबाई पोपटराव पाटील या दांपत्यांवर गुरुवारी शहापूर येथे एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा केंद्राचे केंद्रप्रमुख अरविंद पोपटराव पाटील हे मुळचे अमळनेर तालुक्यातील शहापूर येथील रहिवाशी आहेत. ते नरडाणा केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते कुटुंबासमवेत धुळे येथील देवपुरातील प्रोफेसर कॉलनीत राहतात. शहापूर येथे राहणाऱ्या त्यांच्या मातोश्री नंदिनीबाई पोपटराव पाटील (वय ७६) यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावली होती. नंदिनीबाई यांचे पती पोपटराव भुताजी पाटील (वय ८३) हे पत्नीच्या आजाराने चिंताग्रस्त होते. २५ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास पोपटराव पाटील यांचे मुलाकडे धुळे येथे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त नातेवाईकांना कळवित असतांनाच दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी धुळ्यातच आजारी असलेल्या त्यांच्या मातोश्री नंदिनीबाई पाटील यांचे देखील निधन झाले.
पोपटराव पाटील हे अमळनेर तालुक्यातील शहापूर गावातील एक प्रगतीशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.