धुळे - जिल्ह्यातील २५ हजार नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब आदी सहव्याधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाचे आतापर्यंत दोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहेत. त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे.
जिल्ह्यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाच्या माध्यमातून आरोग्य पथक घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करीत आहे. त्यात २५ हजार ६२२ नागरिकांना काहीना काही व्याधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी राज्य शासनाने अभियान हाती घेतले आहे. त्यामुळे लक्षणे असणाऱ्या रुग्णांची चाचणी करण्यात येते. तसेच सर्वेक्षणाच्या माध्यमातून सहव्याधींचे निदान होत असल्याने पुढील उपचारांना लवकर सुरुवात करणे शक्य होत आहे. तसेच बाधित रुग्ण लवकर लक्षात येण्यास मदत झाली. सर्वेक्षणाच्या माध्यमातून ३ हजार १४५ रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यापैकी २०४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील ३ लाख २९ हजार २४१ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यासाठी ७०२ पथके नेमण्यात आली होती.
कोविडचे २०४, सरीचे २५९ रुग्ण
- माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाच्या माध्यमातून सहव्याधी असलेले, कोरोनाबाधित व सारी आजाराचे रुग्ण आढळले आहेत.
- सहव्याधी असलेले २५ हजार ६२२, कोरोनाबाधित २०४ व सरीचे २५९ रुग्ण आढळले आहेत.
- सर्वेक्षणाच्या माध्यमातून ३ हजार १४५ रुग्णांना कोरोना चाचणीसाठी संदर्भित करण्यात आले होते.
धुळे तालुक्यात जास्त -
धुळे तालुक्यात सर्वाधिक सहव्याधी असलेले रुग्ण आढळले आहेत. धुळे तालुक्यातील ११ हजार ९८ नागरिकांना मधुमेह व उच्च रक्तदाब यासारख्या सहव्याधी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुढे काय -
माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाचे दोन टप्पे व मी जबाबदार अभियानाचे एक असे तीन सर्वेक्षण आतापर्यंत झाली आहेत. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांसोबतच सहव्याधी असलेले रुग्ण आढळले आहेत. सारी व सहव्याधी असलेल्या रुग्णांचे तत्काळ लसीकरण करण्यात येणार आहे. सहव्याधी असलेल्या कोणत्या रुग्णांचे लसीकरण बाकी आहे याचा आढावा सध्या घेतला जात आहे. यासाठी आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांची मदत होत आहे.
प्रतिक्रिया -
माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले आहे. सर्वेक्षणात आढळलेल्या बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच सहव्याधी असलेल्या रुग्णांचे लसीकरण करण्यावर भर दिला आहे. ज्या रुग्णांना सहव्याधी आहे व त्यांना कोरोना होऊन गेला आहे. त्यांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे. यामुळे म्युकरमायकोसिस सारख्या आजारांची लक्षणे असतील तर ते तत्काळ लक्षात येईल व त्यांना लवकर उपचार मिळणे शक्य होणार आहे. व आजार बळावणार नाही.
- डॉ. मनीष पाटील, जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकार