महिलांसाठी २८ तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २३ जागा राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:10 IST2019-05-21T12:08:48+5:302019-05-21T12:10:12+5:30
जिल्हा परिषद : गट, गणांची अंतिम प्रभाग रचना, मतदारयादी तयार करण्याबाबत सूचनेची शक्यता

dhule
धुळे : जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील चारही पंचायत समित्यांच्या गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून तसे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. त्यानुसार महिलांसाठी २८ तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २३ जागा राखीव असणार आहेत.
या रचनेवर प्राप्त हरकतींवर विभागीय आयुक्तांकडे गेल्या आठवड्यात सुनावणी घेण्यात आली. त्यात ४९ पैकी ४८ हरकती फेटाळण्यात आल्या. केवळ एक हरकत मान्य करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गेल्या वर्षी जिल्हाधिकाºयांनी गट, गणांची रचना जाहीर करून आरक्षण काढले होते. त्याविरोधात काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतरही शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीवरील स्थगिती उठविण्यात आली. त्यानंतर जि.प., पं.स. निवडणुकीसाठी जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाचे कलम ५८ (१) (अ) अन्वये पंचायत समितीच्या निर्वाचक गणांची रचना व सदस्य संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसह राखून ठेवलेले विभाग व निर्वाचक गण दर्शविणारा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसिद्ध केला. त्यावर २० हरकती आल्या. स्थगिती मिळण्यापूर्वी २९ हरकती आल्या होत्या. त्यामुळे या एकूण ४९ हरकतींवर नाशिक विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्याकडे सुनावणी झाली. त्यांनी ४९ पैकी ४८ हरकती फेटाळल्या.
मान्य केलेली एक हरकत शिरपूर तालुक्यातील होती. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या अधिक आहे त्या गावाचे नाव त्या गणास द्यावे, अशी सूचना या हरकतीत नमूद होती. ही हरकत मान्य करण्यात आली. त्यानुसार मोठ्या ग्रामपंचायतीचे नाव त्या गणाला दिले जाणार आहे. त्या नंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले.
आता मतदार यादी तयार करण्याबाबत सूचना प्राप्त होण्याची शक्यता आहे.