लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :जिल्ह्यातील १३ केंद्रावर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी शनिवारी परीक्षा झाली. जिल्ह्यातून यासाठी पाच हजार ११ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी चार हजार ४५० विद्यार्थी हजर होते. तर ५६१ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. परीक्षेचा निकाल मार्च महिन्यात जाहीर होणार आहे.परीक्षेसाठी जिल्ह्यातून पाच हजार ११ विद्यार्थ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली होती. शनिवारी धुळे शहरातील कमलाबाई कन्या शाळा, जे.आर.सिटी हायस्कूल,जयहिंद माध्यमिक विद्यालय आणि शिवाजी हायस्कूल अशा चार परीक्षा केंद्रासह साक्री,शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातील १३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी चार हजार ४५० परीक्षार्थी विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तर ५६१ विद्यार्थी गैरहजर राहिले. बुध्दिमत्ता चाचणी,अंकगणित आणि भाषा अशा तीन विषयांची ही निवड चाचणी झाली. त्यात बुध्दिमत्ता चाचणी ६० गुणांची तर अंकगणित आणि भाषा चाचणी प्रत्येकी ३० गुणांची होती.सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या काळात परीक्षा सुरळीत पार पडली.या परीक्षेचा अंतिम निकाल मार्च महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेचा निकाल नवोदय विद्यालयच्या संकेतस्थळावर विद्यार्थी पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे. तसेच जवाहर नवोदय विद्यालय नकाणे, शिक्षणाधिकारी कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात येणार आहे.जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात शिक्षणासाठी दरवर्षी परीक्षा घेतली जाते. मागील वर्षी ही परीक्षा लांबली होती. यंदा ती वेळेवर झाली. या विद्यालयात प्रवेशपूर्व परीक्षेतूनच प्रवेश मिळतो. त्यामुळे ही परीक्षा महत्त्वाची ठरते.
५६१ विद्यार्थ्यांनी मारली परीक्षेला दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 22:50 IST