मोराणे येथील दूध संकलन केंद्रातून २ लाख ८१ हजाराची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 16:18 IST2019-04-10T16:17:04+5:302019-04-10T16:18:30+5:30
अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल, परिसरात खळबळ

मोराणे येथील दूध संकलन केंद्रातून २ लाख ८१ हजाराची रोकड लंपास
आॅनलाइन लोकमत
धुळे : मोराणे (प्र.ल.)शिवारात असलेल्या एका दूध संकलन केंद्रातून अज्ञात चोरट्याने कपाटातून २ लाख ८१ हजार रूपये लंपास केले. ही घटना ८ एप्रिल रोजीच्या रात्री ८.३० ते ९ एप्रिलच्या सकाळी ७.३० वाजे दरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे- साक्री रोडवरील मोराणे (प्र.ल) शिवारात सत्यप्रकाश मनोज शुक्ल (वय २१, रा. स्वामी नगर, देवपूर धुळे) यांचे शुक्ला दूध संकलन केंद्र आहे. ८ रोजी हे दूध संकलन केंद्र रात्री बंद करण्यात आले.
अज्ञात चोरट्यांनी या दूध संकलन कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले २ लाख ८१ हजार ९८० रूपये लंपास केले.
घटनास्थळी साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, यांनी भेट देवून पहाणी केली.
या चोरीमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे. याप्रकरणी सत्यप्रकाश शुक्ला यानी धुळे तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरूद्ध भादंवि ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अर्जुन गोटे करीत आहेत.