२ लाखाचे १५ मोबाइल चोरले, विक्री होण्यापूर्वीच पकडले, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकाला अटक
By देवेंद्र पाठक | Updated: January 9, 2024 18:31 IST2024-01-09T18:28:21+5:302024-01-09T18:31:16+5:30
Dhule News: चोरून आणलेल्या मोबाइलचे पार्ट्स काढून त्याची परस्पर विल्हेवाट लावण्यापूर्वीच एकाला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सोमवारी सायंकाळी यश आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ लाख ८८ हजार रुपये किमतीचे १५ मोबाइल जप्त करण्यात आले.

२ लाखाचे १५ मोबाइल चोरले, विक्री होण्यापूर्वीच पकडले, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकाला अटक
- देवेंद्र पाठक
धुळे - चोरून आणलेल्या मोबाइलचे पार्ट्स काढून त्याची परस्पर विल्हेवाट लावण्यापूर्वीच एकाला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सोमवारी सायंकाळी यश आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ लाख ८८ हजार रुपये किमतीचे १५ मोबाइल जप्त करण्यात आले. कबीर युसूफ काझी (वय ५६, रा. गजानन कॉलनी, चाळीसगाव रोड, धुळे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
शहरातील गजानन कॉलनी परिसरात एक इसम हा मोबाइल चोरी करुन त्याचे पार्ट्स काढून परस्पर विक्री करत असतो अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. माहिती मिळताच पथकाला रवाना करण्यात आले. त्यावेळेस चाळीसगाव रोड भागात एकजण संशयितरीत्या फिरताना आढळून आला. त्याची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या क्रमांकाचे १५ मोबाइल आढळून आले. त्याबद्दल तो स्पष्टीकरण पोलिसांना देऊ शकला नाही. सर्व मोबाइल चोरीचे असल्याचे लक्षात आले आणि कबीर युसूफ काझी (वय ५६, रा. गजानन कॉलनी, चाळीसगाव रोड, धुळे) याला अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता २५ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अंबिका नगरातून एकाचा मोबाइल लंपास केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हाही दाखल आहे. कबीर काझी याने तो माेबाइल चोरल्याची कबुली पोलिसांना दिल्याने पुढील तपासासाठी त्याला चाळीसगाव रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक शाम पाटील, पोलिस कर्मचारी सुरेश भालेराव, पंकज खैरमोडे, रविकिरण राठोड, गुणवंत पाटील, सुशील शेंडे, नीलेश पाेतदार, अमोल जाधव यांच्या पथकाने केली.