दीड हजार ठेवीदारांची १० कोटीत फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 23:18 IST2020-02-10T23:17:24+5:302020-02-10T23:18:13+5:30
धुळे जिल्हा : सहा जणांविरुध्द गुन्हा

दीड हजार ठेवीदारांची १० कोटीत फसवणूक
धुळे : आकर्षक व्याजदर, विविध प्रेक्षणीय स्थळी सहल आणि सोने-चांदी देण्याचे आमिष दाखवत १ हजार ४६१ ठेवीदारांची १० कोटी २९ लाख ४१ हजार ९५६ रुपयांची आर्थिक फसवणूक झाली़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात सहा संशयितांविरुध्द सोमवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला़
धुळे तालुक्यातील शिरुड येथे उज्ज्वलम अॅग्रो मल्टीस्टेट को आॅपरेटीव्ह सोसायटी प्रा़ लि़ नाशिक आणि माऊली मल्टीस्टेट क्रेडीट को आॅपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड कार्यालय स्थापन करण्यात आले होते़ या ठिकाणी आॅक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१९ या कालावधीत १ हजार ४६१ ठेवीदारांनी आपल्या वेगवेगळ्या रक्कमेची गुंतवणूक या सोसायटीत केली होती़ त्यांना आकर्षक व्याजदर, विविध प्रेक्षणीय स्थळी सहल यासह सोने-चांदी देण्याचे आमिष दाखविण्यात आले़ को आॅपरेटीव्ह सोसायटीचे स्थानिक प्रतिनिधी यांच्याकडून प्रसार करण्यात आला़ ठेवीदारांकडून रोखीने ठेवी स्विकारण्यात आल्या़ तालुक्यातील शिरुड येथे कार्यालय सुरु करुन अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले़ ठेवींची मुदत पूर्ण झाल्यावर सुध्दा ठेवीदारांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ केली जात होती़ पाठपुरावा करुनही त्याचा उपयोग होत नव्हता़ कार्यालय बंद करुन पसार झाल्याने संशय बळावला आणि फसवणूक झाल्याचे समोर आले़
याप्रकरणी धुळे तालुक्यातील गोंदूर येथील किशोर चिंधू पाटील याने फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, विष्णू रामचंद्र भागवत (रा़ गवंडगाव ता़ येवला, जि़ नाशिक), प्रफुल्ल निस्ताने (मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक), अभिजीत येरुरकर (शिरुड कंपनीचे सचिव), सपना संदीप अमृतकर (शिरुड ता धुळे, शाखाचे मॅनेजर, हल्ली मुक्काम मेहूणबारे ता़ चाळीसगाव), भैय्यासाहेब यशवंत गुजेला (धुळे), भैय्या दिलीप अहिरे (धुळे) या संशयिताविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला़ स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे घटनेचा तपास करीत आहेत़ याप्रकरणाची ग्रामीण भागात चर्चा आहे़