पाच वर्षात १४ कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 21:48 IST2020-12-08T21:48:27+5:302020-12-08T21:48:46+5:30
सुनील साळुंके शिरपूर : शासनाकडून मिळणारा अव्वाच्या सव्वा वेतनात आपला चरित्रार्थ सुरळीत चालू शकतो, तरीदेखील सामान्य जनतेच्या खिशातून पैसा ...

dhule
सुनील साळुंके
शिरपूर : शासनाकडून मिळणारा अव्वाच्या सव्वा वेतनात आपला चरित्रार्थ सुरळीत चालू शकतो, तरीदेखील सामान्य जनतेच्या खिशातून पैसा कसा ओढता येईल यासाठी वेगवेगळी शक्कल लढवून लाखोची मालमत्ता झाल्यानंतरदेखील पैशांचा हव्यास सुटत नाही. शेवटी ‘अती तिथे माती’ होतेच. असेच लाचखोरीचे प्रकार गेल्या काही वर्षांत तालुक्यात घडले असून, या लाचखोरांना अटक करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत शिरपूर तालुक्यातील सर्वाधिक कर्मचारी लालसेला बळी पडत असल्याचे वेळोवेळी झालेल्या कारवायांवरून दिसत आहे. आतापर्यंत १९ अधिकारी आणि कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत.
येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील परीक्षण भूमापक अधिकारी राजू छगन पवार यांना बुधवारी लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
तत्पूर्वी गेल्या २२ डिसेंबर २०१९ रोजी ठेकेदारांकडून इलेक्ट्रिक कामांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी ७१ हजारांची लाच स्वीकारताना महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी सुदर्शन साळुंखे व सहायक अभियंता स्वप्नील माळी या दोघांना पथकाने अटक केली होती.
उपजिल्हा रुग्णालयातील सहायक अधीक्षक गोपाळ पीतांबर राणे व कनिष्ठ लिपिक गणेश श्याम माळवे यांना ६५ हजार रुपयांची लाच घेताना ४ सप्टेंबर २०१९ रोजी पकडले होते. या रुग्णालयातील ही पहिलीच घटना ठरली.
अर्थे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहाो अधीक्षक सुनील शिवाजी खराटे यांना ७ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी २६ मार्च २०१८ रोजी अटक झाली होती.
जातोडे येथील तलाठी डी. ओ. इहावले हे शेतकऱ्याच्या उताऱ्यावरील बोजा कमी करण्यासाठी लाच घेताना ५ जुलै २०१७ रोजी जाळ्यात अडकले होते.
सावेरचा ग्रामसेवक सावेर-गोदी येथील ग्रामसेवक राहुल रायसिंग यांना २१ जून २०१७ रोजी, तर २१ जून २०१७ रोजी शहरात दुकान निरीक्षक भारती पावरा व पंटर प्रमोद पाटील यांना पकडले होते.
थाळनेर येथील भूमिअभिलेख कार्यालयातील परीक्षण भूमापक अधिकारी बी. बी. सोनवणे यांना २९ डिसेंबर २०१६ रोजी आणि शिरपूर पंचायत समितीच्या प्रशासन विभागातील कनिष्ठ सहायक प्रमोदगिरी सुभाषगिरी गोस्वामी यांना ३१ ऑगस्ट २०१६ रोजी पकडण्यात आले. पंचायत समितीतील बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता आर. आर. पाटील यांना ३ हजार रुपयांची लाच घेताना जानेवारी २०१५ पकडले होते.
२० ऑक्टोबर २०१५ मध्ये येथील पंचायत समितीतील कृषी अधिकारी अभय नथू कोर यांनी कृषी दुकानाचा परवाना देण्यासाठी लाच मागितली होती.