जिल्ह्यात १२३४ पोलिओ लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 19:40 IST2021-01-03T19:40:11+5:302021-01-03T19:40:28+5:30
धुळे : जिल्ह्यात १७ जानेवारी रोजी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पल्स पोलिओचे डोस देण्यात येतील. कोरोना विषाणूच्या ...

जिल्ह्यात १२३४ पोलिओ लसीकरण केंद्र
धुळे : जिल्ह्यात १७ जानेवारी रोजी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पल्स पोलिओचे डोस देण्यात येतील. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने सतर्कता बाळगावी. या मोहिमेविषयी गावागावात जनजागृती करावी, असे निर्देश पल्स पोलिओ लसीकरण समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार ६६४ बालकांना पोलिओ लस देण्यात येईल. त्यासाठी १ हजार २३४ लसीकरण केंद्र असतील. बूथवर प्रत्यक्ष डोस देणे, बालकांच्या पालकांना बोलावून आणण्यासाठी तीन हजार ४२६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. २४६ अधिकारी व कर्मचारी पर्यवेक्षण करतील. याशिवाय जिल्हास्तरावर पर्यवेक्षणासाठी ११ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. बसस्थानक, रेल्सेस्थानक, तपासणी नाक्यावर ६१ ट्रान्झिट पथके असतील. भटकंती करणारे कामगार, वीटभट्टी, ऊसतोड कामगार, रोड कामगारांच्या बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी ९५ मोबाइल पथके असतील. याबाबत गावागावांत जनजागृती करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांनी सांगितले.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी गठित टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात नुकतीच झाली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, डॉ. शिवचंद्र सांगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुबेर चावरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरन्नुम पाटील, डॉ. प्रसन्न कुलकर्णी, डॉ. भूषण मोरे, अमित राजपूत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यादव म्हणाले, जिल्हास्तरावर वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षकांचे मार्गदर्शनपर प्रशिक्षण दक्षता अधिकाऱ्यांनी घेतले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर काम करणारे, पर्यवेक्षण करणारे आरोग्य सहायक, सहायिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, मुख्य सेविका, आशा कार्यकर्ती, स्वयंसेवकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांना त्यांचे लसीकरण बूथ, लाभार्थी, घरभेटीची पथके, ट्रान्झिट पथके, मोबाइल पथकांचे नियोजन करण्यात आले आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानक, ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, रोड कामगार, बाजार, यात्रा या ठिकाणी बालकांना पोलिओ देण्यासाठी ट्रान्झिट व मोबाइल पथकांचे नियोजन करण्यात आले आहे.