मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ धाराशिव येथे तरुण बसले उपोषणास
By सूरज पाचपिंडे | Updated: September 7, 2023 14:55 IST2023-09-07T14:55:00+5:302023-09-07T14:55:54+5:30
लाठीहल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा तात्काळ द्यावा

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ धाराशिव येथे तरुण बसले उपोषणास
धाराशिव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणास पाठींबा दर्शविण्यासाठी धाराशिव येथे दोन मराठा युवक गुरुवारपासून उपोषणास बसले आहेत.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणास राज्यभरातून मराठा संघटनांकडून पाठींबा दर्शविला जात आहे. मात्र, शासनाकडून उपाेषणाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत तालुक्यातील कौडंगाव येथील अक्षय नाईकवाडी, धाराशिव येथील निलेश साळुंके हे दोन तरुण गुरुवारपासून जिल्हाकचेरीसमोर उपोषणास बसले आहेत.
मराठा आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे, आंदोलनात आंदोलनकर्त्यावर नोंदविण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, लाठीहल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा तात्काळ द्यावा, आदी मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत. मागण्या मान्य झाल्याशिवाय, उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्राही उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.