पिवळ्या सोन्याची झळाळी; मालामाल करेल की मृगजळ ठरेल ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:40 IST2021-09-16T04:40:55+5:302021-09-16T04:40:55+5:30
मागच्या पाच वर्षांत सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत तालुक्याची सोयाबीनचे कोठार अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. खरिपाच्या एकूण ...

पिवळ्या सोन्याची झळाळी; मालामाल करेल की मृगजळ ठरेल ?
मागच्या पाच वर्षांत सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ होत तालुक्याची सोयाबीनचे कोठार अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. खरिपाच्या एकूण क्षेत्रात ८० टक्क्यांवर घेतल्या जाणाऱ्या या पिकाचा अर्थकारणावर मोठा प्रभाव आहे. असे असले तरी हवामानाची अनुकूलता, रोगांचा प्रादुर्भाव, पेरणी ते काढणी दरम्यान लाभलेली वरुणराजाची साथ, बाजारभाव या सर्व बेभरवशाच्या स्थितीत पेरलं ते उगवेल का, उगवलेलं जगेल का, जगलेलं पदरात पडेल का अन् पदरी पडलेलं चांगल्या दरात विकेल का, याचा काही नेम नसतो. यंदा मात्र पेरणी ते काढणी या टप्यात प्रत्येकांच्या वावरात वेगवेगळे अनुभव असले तरी इकडे बाजारात मात्र मागच्या तीन महिन्यांत दरदिवशी दरात वृद्धी नोंदली गेली. आता हे पीक हाती येईल का? आले तर त्यास सध्याचा दर मिळेल का? की भरल्या बाजारात तो पुन्हा ‘बेभाव’ होणार याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
असा वाढला सोयाबीनचा पेरा
वर्ष पेरा (हेक्टर )
२०१७ ४८०००
२०१८ ५२०००
२०१९ ६३०००
२०२० ६५०००
२०२१ ६००००
बॉक्स १
झटपट अन् जास्त कालावधीचे सोयाबीन
ऐंशी ते नव्वद, नव्वद ते शंभर व शंभर ते ११० दिवस अशा झटपट, मध्यम व जास्त कालावधीत काढणीस येणारे सोयाबीन वाण याभागात घेतले जात असले तरी यास वाढ, फुलोरा व शेंगावस्थेत पूरक पाऊसपाणी समान गरजेचे असते अन् मिळणारा दर मात्र वेगवेगळा असतो. यंदा संपूर्ण हंगामात मात्र या दरात वृद्धी नोंदली आहे.
दरवृद्धी : पदरी पडेल की मृगजळ ठरेल
आगामी महिनाभर काढणी अन् मुख्य आवकीचा आहे. याकाळात आत्तापर्यंतचा ‘भाव’ आपल्यातील उठावातील स्थिरता कायम ठेवतो की ‘पिछे मुड’ असा पवित्रा घेतो याची काळजी शेतकऱ्यांना लागली आहे. काढणी हंगामाला निसर्गाची अन् काढणी झालेल्या मालाला बाजारातील दराची साथ मिळाली तरच शेतकरी मालामाल होणार आहे. नसता उभं पीक अन् दर दोन्ही शेतकऱ्यांसाठी मात्र मृगजळ ठरणार आहेत.
पिवळ्या सोन्याची झळाळी कायम राहिलं का?
सध्या झटपट येणाऱ्या व लवकर पेर झालेल्या सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे. आगामी पंधरा दिवसांत उर्वरित फडास पक्वता येईल. यानंतरच्या पुढील पंधरवड्यात काढणीची लगबग सुरू होईल. यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आवक सुरू होईल. आवक वाढताच दर कमी होतो असा आजवरचा अनुभव आहे. यंदा हाच कित्ता गिरवला जातो की सातत्यपूर्ण होणारी दरवाढ शेतकऱ्यांना मालामाल करून जाते हे आगामी काळच ठरवणार आहे.