तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहाचा एक्स-रे; भिंतीच्या आतील तड्यांचाही शोध घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 17:35 IST2025-02-13T17:33:22+5:302025-02-13T17:35:01+5:30

तुळजाभवानी मंदिराच्या स्थायित्वाचा आणि मजबुतीकरणाचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आले आहे.

X-ray of the sanctum sanctorum of Tulja Bhavani temple; Will search for cracks inside the wall too | तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहाचा एक्स-रे; भिंतीच्या आतील तड्यांचाही शोध घेणार

तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहाचा एक्स-रे; भिंतीच्या आतील तड्यांचाही शोध घेणार

धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या मंदिराला पुरातन रूप प्राप्त करून देण्यासाठी सध्या पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिरात कामे सुरू आहेत. यावेळी अनेक ठिकाणी भिंतीला तडे गेले असल्याचे आढळून आले आहे. या अनुषंगाने अगदी भिंतीच्या आतीलही तड्यांचा शोध घेण्यासाठी एक्स-रे तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी पुरातत्त्वच्या सहायक संचालक जया वाहने यांनी दिली.

तुळजाभवानी मंदिराच्या स्थायित्वाचा आणि मजबुतीकरणाचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आले आहे. त्यात मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील आणि सभामंडपातील दगडी बीम, स्तंभ व कर्णशिळांमध्ये तडे आढळून आले आहेत. या अनुषंगाने बोरस्कोपी चाचणीतून मंदिरात वापरण्यात आलेल्या वेगवेगळ्या बांधकाम साहित्याची तपासणी करण्यात येणार आहे. क्ष-किरण तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्भगृह आणि शिखराच्या आतील भागातील लपलेले तडे आणि नुकसान समोर येणार असल्याचे जया वाहने म्हणाल्या. तसेच ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार तंत्रज्ञानाद्वारे मंदिराचा पाया आणि भूगर्भातील स्थिरतेचीही तपासणी होणार आहे. या तिन्ही चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर मजबुतीकरणासंदर्भात त्यावेळी निर्णय घेतला जाणार आहे.

भूकंपानंतर झाले होते बळकटीकरण
मंदिराच्या शिखराचे बळकटीकरण १९९३ साली झालेल्या भूकंपानंतर करण्यात आले होते. मात्र, त्या दुरुस्तीमुळे शिखरावर अतिरिक्त भार येऊन मूळ दगडी रचनेला तडे गेल्याचा निष्कर्ष पुरातत्त्व विभागाने केलेल्या पाहणीतून काढण्यात आला आहे.

सुरक्षिततेसाठी निर्णायक पावले
श्री तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षिततेसाठी निर्णायक पावले उचलण्यात आली आहेत. मंदिराच्या मूळ स्थापत्यशैलीचे जतन करताना भाविकांची सुरक्षा आणि ऐतिहासिक वारशाचे रक्षण या दोन्ही बाबींचा विचार शासनाने केला आहे. या अनुषंगानेच विविध तंत्रज्ञानांची मदत घेत काही चाचण्या लवकरच केल्या जातील.
- जया वाहने, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग

Web Title: X-ray of the sanctum sanctorum of Tulja Bhavani temple; Will search for cracks inside the wall too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.