कळंब-लातूर राज्यमार्गाचे काम अखेर चालू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:33 IST2021-09-19T04:33:57+5:302021-09-19T04:33:57+5:30
कळंब : ‘गो स्लो’ म्हणजेच सावकाश जा, असे फलक कळंब-लातूर या राज्यमार्गावर जागोजागी लावले गेले आहेत, ते हटतील व ...

कळंब-लातूर राज्यमार्गाचे काम अखेर चालू
कळंब : ‘गो स्लो’ म्हणजेच सावकाश जा, असे फलक कळंब-लातूर या राज्यमार्गावर जागोजागी लावले गेले आहेत, ते हटतील व रस्ता काही महिन्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा वाढली आहे. जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने या रस्त्याचे काम संबंधित कंत्राटदार कंपनीने अखेर सुरू केले असून, वाहनधारकांत समाधान व्यक्त होत आहे.
बांधकाम विभागाने हायब्रीड अन्युटी योजनेंतर्गत केलेल्या कामाची गती काही फास्ट होत नसल्याने वाहनधारकांत नाराजी होती .मागील २-३ वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे कळंब-लातूर ही तब्बल ७० किमीची वाट बिकट झाली. या कामासाठी मागील काळात काही लोकप्रतिनिधींनी केलेली शिष्टाईही कामी आली नसल्याने यंत्रणाचे कान कोण टोचणार? हाही प्रश्न होता. कळंब-लातूर हा राज्यमार्ग कळंब व लातूर या दोन व्यापारी शहराला जोडणारा राज्यमार्ग आहे. या मार्गावरील शिराढोण, रांजणी ही मोठी गावेही मोठी लोकवस्ती असलेली आहेत. याच भागात सर्वांत जास्त ऊस उत्पादन होते. मांजरा धरणाला समांतर असलेला हा राज्यमार्ग ग्रीन बेल्ट मार्ग म्हणूनही ओळखला जातो.
रांजणी येथील साखर कारखान्यासह लातूर जिल्ह्यातील विकास व मांजरा या कारखान्यालाही हा भाग ऊस पुरवठा करतो. त्यामुळे साहजिकच या मार्गावर मोठी वाहतूक आहे. हीच बाब लक्षात घेऊन महायुती शासनाच्या काळात या रस्त्याचे काम हायब्रीड अन्युटी योजनेखाली हाती घेतले होते. त्यामुळे हा रस्ता आता वाहतुकीस चांगला होईल, अशी या मार्गावरील गावातील नागरिकांची तसेच वाहनधारकांची अपेक्षा होती. हे काम चालू होऊन आता दोन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला तरीही रस्त्याच्या कामाचे भिजत घोंगडे कायम होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना सोमवारी निवेदन देण्यात आले होते. ‘हे काम त्वरित सुरू करा, अन्यथा परिणामास सामोरे जा’ असा अल्टिमेटमही निवेदनात दिला होता.
याची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना कामे सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर कंत्राटदाराने यंत्रणांची जुळवाजुळव करीत शनिवारी या मार्गावर कामाला सुरुवात केली आहे. या कामात सातत्य ठेवून युद्धपातळीवर काम केल्यास सहा ते आठ महिन्यांत रस्ता पूर्ण होऊ शकणार आहे.
चौकट -
...तर वाहतूक यंत्रणा कोलमडेल !
हा रस्ता मांजरा धरणाच्या ग्रीन बेल्टचा भाग आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांतील साखर कारखाने तसेच जागरी पावडर बनविणाऱ्या कारखान्यांना हा भाग मोठ्या प्रमाणावर ऊस पुरवठा करतो. ऑक्टोबर महिन्यात सर्वच कारखान्यांचे गाळप सुरू होणार असल्याने ऊस वाहतूक वाढणार आहे, परिणामी जड वाहतूक वाढणार आहे. रस्त्याची अवस्था नाही सुधारली तर या मार्गावरील वाहतूक यंत्रणा कोलमडेल, असे वाहनधारकांचे म्हणणे आहे.
काम जलदगतीने होण्यासाठी पाठपुरावा करणार - दूधगावकर
हे रस्त्याचे काम रखडल्याने जवळपास ७० जण अपघातात जखमी झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. किती वाहनांचे नुकसान झाले याचा हिशेब नाही. काम सुरू झाल्यानंतर ते पूर्ण करून घ्यायची जबाबदारी संबंधित यंत्रणेची आहे. एखादा कंत्राटदार काम पूर्ण करू शकत नसेल तर त्याला काम कोणत्या आधारावर दिले हा प्रश्नही आहे. आता काम चालू झाले ही चांगली बाब आहे; पण ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिली.