पाणीपुरवठ्याची वीज खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:31 IST2021-03-20T04:31:43+5:302021-03-20T04:31:43+5:30
वाशी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या वंजारवाडी प्रकल्प, जलशुद्धीकरण केंद्रासह शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठाही वीज कंपनीने थकीत बिलापोटी खंडित केला. त्यामुळे ...

पाणीपुरवठ्याची वीज खंडित
वाशी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या वंजारवाडी प्रकल्प, जलशुद्धीकरण केंद्रासह शहरातील पथदिव्यांचा वीजपुरवठाही वीज कंपनीने थकीत बिलापोटी खंडित केला. त्यामुळे शहरवासीयांना आगामी काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता असून, रस्तेही अंधारात बुडणार आहेत. वाशी शहरास भूम तालुक्यातील वंजारवाडी प्रकल्पावरून पाणीपुरवठा करण्यात येतो. या प्रकल्पातील विहिरीवर १ कोटी १२ लाख, तर जलशुद्धीकरण केंद्राचे ५७ लाख रुपये वीज बिल थकले आहे. त्यामुळे भूमचे विभागीय अभियंता राहुल पवार यांनी पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे, तसेच शहरातील सामुदायिक विहीर व काही कूपनलिकांद्वारे पाणीपुरवठा होत होता; परंतु या योजनेकडेही वीज कंपनीचे ८८ लाख रुपये थकले आहेत. एकूणच पाणीपुरवठा योजनेकडे एकूण २ कोटी ५७ लाख रुपये थकले असून, शहरातील पथदिव्यांचेही ४ कोटी रुपये थकीत असल्याची माहिती वाशी येथील उपविभागीय अभियंता रमेश शेंद्रे यांनी दिली़
चौकट.....
पथदिव्यांचे ४ कोटी थकीत
शहरातील पथदिव्यापोटी चार कोटी रुपये थकलेले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मीटर जळून खाक झालेले असताना सरासरी वीज बिल आकारण्यात येत आहे. याकडे ना वीज कंपनीचे लक्ष आहे ना नगरपंचायतीच्या संबंधित विभागाचे. शहरातील अनेक भागांत दिवसा व रात्रीही पथदिवे सुरूच असतात. नगरपंचायतीवर सध्या प्रशासक असून, प्रशासकपदी कळंबच्या अहिल्या गाठाळ आहेत, तर मुख्याधिकारी म्हणून गिरीश पंडित हे कार्यरत आहेत.
कोट......
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नियमित येणाऱ्या बिलांचा भरणा करण्यात येत होता. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून वीज बिलाची थकबाकी आहे. ती वरचेवर वाढतच आहे. बिल कमी व व्याज जास्त अशी स्थिती निर्माण झाली आहे. पथदिवे व पाणीपुरवठा योजनेच्या बिलासाठी वरिष्ठांशी विचारविनिमय करून मार्ग काढण्यात येईल.
- गिरीश पंडित, मु्ख्याधिकारी