आकाशातून पडला सोनेरी दगड, तलाठ्याने तात्काळ घेतली शेतात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:35 AM2021-09-25T04:35:52+5:302021-09-25T12:22:44+5:30

वाशी (जि. उस्मानाबाद ) : वाशी येथील एक शेतकरी शेतात कामात व्यस्त असताना अचानक त्यांच्या पुढ्यात अवकाशातून अडीच किलो ...

The golden stone fell from the sky, took the talatta in Vashi and ran to the field | आकाशातून पडला सोनेरी दगड, तलाठ्याने तात्काळ घेतली शेतात धाव

आकाशातून पडला सोनेरी दगड, तलाठ्याने तात्काळ घेतली शेतात धाव

googlenewsNext
ठळक मुद्देवाशी शहरात वास्तव्यास असलेले शेतकरी प्रभू माळी यांची शहरालगतच शेती आहे. माळी हे त्यांच्या अल्प शेतीत भाजीपाला पिकवतात व दररोज काढणी करून त्याची विक्री शहरात स्वत:च करतात.

वाशी (जि. उस्मानाबाद) : वाशी येथील एक शेतकरी शेतात कामात व्यस्त असताना अचानक त्यांच्या पुढ्यात अवकाशातून अडीच किलो वजनाचा एक दगड येऊन पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकारानंतर भांबावलेल्या त्या शेतकऱ्याने तहसील कार्यालयाकडे तो दगड सुपुर्द केला असून, आता या दगडाची नागपुरात तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, उल्कापातातून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता भूवैज्ञानिकांनी वर्तविली आहे.

वाशी शहरात वास्तव्यास असलेले शेतकरी प्रभू माळी यांची शहरालगतच शेती आहे. माळी हे त्यांच्या अल्प शेतीत भाजीपाला पिकवतात व दररोज काढणी करून त्याची विक्री शहरात स्वत:च करतात. शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास ते आपल्या शेतात नेहमीप्रमाणे भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. काढणीचे काम सुरू केले असतानाच अचानक त्यांच्या समोर अंदाजे अडीच किलो वजनाचा लालसर रंगाचा दगड अवकाशातून आवाज करीत येऊन पडला. समोर अचानक दगड पडल्याने ते घाबरून गेले. त्यांनी आजूबाजूला पाहिले असता जवळपास कोणीही नव्हते. माळी यांनी दगड निरखून पाहिला असता तो काहीसा वेगळा जाणवला. अशा प्रकारचा दगड त्यांनी पहिल्यांदाच पाहिला असल्याने कुतूहलापोटी त्यांनी तो घराकडे आणला व काही नागरिकांना याची माहिती सांगितली. नागरिकांच्या सूचनेवरून त्यांनी या प्रकाराची माहिती तहसीलदार नरसिंग जाधव यांना दिली व तो तहसील कार्याकडे सुपुर्द केला. यानंतर या दगडाचा व दगड पडलेल्या ठिकाणाचा पंचनामा तलाठ्यांमार्फत करण्यात आला. दरम्यान, तो दगड तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, या घटनेमुळे वाशी शहरात कुतूहल व भीती निर्माण झाली होती.

हा दगड अवकाशातून आला, असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. तो कोणत्या प्रकारचा आहे, याची माहिती जाणून घेण्यासाठी उस्मानाबाद येथील भूवैज्ञानिक कार्यालयास कळविले असून, परीक्षणानंतरच या दगडाविषयीची माहिती समजणार असल्याचे तहसीलदार नरसिंग जाधव म्हणाले.

उल्कापाताची शक्यता

अवकाशातील आकाशगंगेतील उल्कापातानंतर ग्रहांचे तुकडे त्यांच्या कक्षेतून सुटून ते पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर ते जळलेल्या अवस्थेत येतात. तर काहींची राख होते. अशा प्रकारचे अपवादात्मक दगड पृथ्वीतलापर्यंत येत असतात. यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. हा दगडही याच प्रकारातील असावा. त्याची तपासणी करण्यासाठी नागपूरच्या भारतीय भूवैज्ञानिक विभागाकडे पाठविण्यात येत असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

- बी. एम. ठाकूर, वरिष्ठ भूवैज्ञानिक, उस्मानाबाद

मी रोजच्याप्रमाणे सकाळी लवकरच भाजीपाला आणण्यासाठी शेताकडे गेलो होतो. काढणी सुरू करताच आकाशातून आवाज करीत एक तांबड्या रंगाचा दगड माझ्यापुढे पडला. सुरुवातीला कोणीतरी तो माझ्या दिशेने फेकला असावा, असे वाटले. त्यामुळे आसपास आवाज देऊन पाहिले. पण कोणीही नव्हते. यामुळे सुरुवातीला भीती वाटली. घाबरतच हात लावून पाहिला. दगड गार होता. नंतर तो उचलून घरी आणला व पुढे तहसीलला जमा केला आहे.

- प्रभू माळी, शेतकरी, वाशी

Web Title: The golden stone fell from the sky, took the talatta in Vashi and ran to the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.