'वासुदेवा', लेकानं पांग फेडलं रं... रयतेचं दान मागणाऱ्याचं 'पोर डॉक्टर होतंय'
By महेश गलांडे | Updated: July 15, 2019 20:23 IST2019-07-15T20:10:02+5:302019-07-15T20:23:09+5:30
डोक्यावर मोर पिसाची टोपी, काखेत झोळी, गळ्यात माळ, कपाळावर गंध, पायात घुंगरू बांधून रयतेचं दान मागत संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर ते फिरले.

'वासुदेवा', लेकानं पांग फेडलं रं... रयतेचं दान मागणाऱ्याचं 'पोर डॉक्टर होतंय'
उस्मानाबाद - वासुदेव आला रे... वासुदेव आला... सकाळच्या पारी हरिनाम बोला... वासुदेव आला रे वासुदेव आला.... सन 1983 सालच्या 'देवता' या मराठी चित्रपटातील हे गाणं आजही कानी पडलं की डोक्यावर मोरपिसं घातलेला रविंद्र महाजनी डोळ्यासमोर उभारतो. महाराष्ट्राची लोककला महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचविण्याचं काम या चित्रपटातील वासुदेवानं केलं. हातात बासरी, डोक्यावर मोरपिसं घातलेली टोपी, अंगात सदरा आणि पायात धोतर घातलेला वासुदेव दोन वेळच्या अन्नासाठी सकाळीच उठून गावातील घराघरात धान्य, पैसा, भाकर मागत असतो. मात्र, अशाच एका वासुदेवाचं पोर आता डॉक्टर होतंय. गावोगावी वासुदेवाचं जगणं सादर करणारा उस्मानाबादच्या अणदुरचा वासुदेव 'दयानंद काळुंके' आता डॉक्टर पोराचा बाप होत आहे.
घरात कलेचा कुठलाच वारसा नसताना केवळ महाविद्यालयीन जीवनात वासुदेवाची भुमिका साकारली आणि महाविद्यालयाला गोल्ड मेडल मिळवून दिलं. महाविद्यालयाच्या उभारणीपासून मिळालेलं हे पहिलेच पदक होतं. त्यामुळे तेव्हापासून आजतागायत दयानंद यांनी 'वासुदेव' कधीच सोडला नाही. नुकतेच एप्रिल महिन्यात त्यांनी एका कार्यक्रमात वासुदेव साकारला होता. डोक्यावर मोर पिसाची टोपी, काखेत झोळी, गळ्यात माळ, कपाळावर गंध, पायात घुंगरू बांधून रयतेचं दान मागत संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर ते फिरले. समाजात प्रबोधन व्हावं, जाणीव-जागृती व्हावी यासाठी आणि लोकांच्या वर्तन बदलासाठी दयानंद काळुंगे यांनी सातत्याने वासुदेव साकारला.
वाड्या-वस्त्यामध्ये आजही गेल्यानंतर लहान मुले गराडा घालतात इतकी वासुदेवाची लोकप्रियता ग्रामीण भागात आहे. "लाख लाख डोळ्यांवरती नकलाकारांच राज्य असतं, स्वताच्या जखमा पुसून इतरांना हसवण्याचं भाग्य असतं", अशा शब्दात आपल्या फाटक्या झोळीचं श्रीमंत वर्णन दयानंद यांनी केलं आहे. घरची परिस्थिती बेताची, चूल धुपत-धुपत पेटत होती. घरचे अठरा विश्व दारिद्र्य, पदव्यूत्तर शिक्षण घेऊन तीन किलो प्रमाणपत्र व पोतं भरुन पदकं उशाला घेऊन नोकरीविना गुदमरलेल्या अवस्थेत ते जीवन जगत होते. ब्रॉकायटीस नावाचा आजार सोबत घेऊन वासुदेवाची भूमिका करून पैसे जमा करीत होते. भूमिका केल्यानंतर श्वसनाचा त्रासही व्हायचा. अनेकदा स्टेजच्या पाठीमागे अडवे व्हायचे आणि परत पोतराज, भविष्यवाला, आराधी, गोंधळी, मद्रासी रामण्णा, झेल्या, भटजी, महिलांची भूमिका, नकला सादर करायचे. परिस्थिती अन् प्रत्येकवेळी श्रोत्यांनी-दर्शकांनी दिलेली दाद मला नेहमीच या कामी प्रोत्साहीत करत असल्याचे दयानंद यांनी म्हटले.
जिद्द, चिकाटी, परिस्थितीची जाण आणि भविष्यात काय करायचे या गोष्टीचं भान ठेवत मुलांनीही शिक्षणात उंच झेप घेतली. खूप शिकूनही मला डॉक्टर, इंजिनिअर, वकील होता आलं नाही, हे शल्य मनात असलं तरी मी दोन डॉक्टरांचा बाप बनायचे हे माझे लक्ष होते आणि त्या दिशेने माझी यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे दयानंद यांनी लोकमतशी बोलताना अतिशय भावुक होऊन सांगितले.