जिल्ह्यावर वरूणराजाची कृपादृष्टी ‘रिमझिम’च...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:31 IST2021-08-29T04:31:16+5:302021-08-29T04:31:16+5:30

उस्मानाबाद -गतवर्षी जिल्ह्यावर वरुणराजाने भरभरून ‘वृष्टी’ केली. वार्षिक सरासरीपेक्षा १३.४ टक्के एवढा जास्तीचा पाऊस झाला हाेता. त्यामुळे लहान-माेठे प्रकल्प ...

Varun Raja's favor on the district is 'Rimjim' ... | जिल्ह्यावर वरूणराजाची कृपादृष्टी ‘रिमझिम’च...

जिल्ह्यावर वरूणराजाची कृपादृष्टी ‘रिमझिम’च...

उस्मानाबाद -गतवर्षी जिल्ह्यावर वरुणराजाने भरभरून ‘वृष्टी’ केली. वार्षिक सरासरीपेक्षा १३.४ टक्के एवढा जास्तीचा पाऊस झाला हाेता. त्यामुळे लहान-माेठे प्रकल्प ओसंडून वाहिले. परिणामी उन्हाळ्यातही पाणी टंचाईच्या झळा गावांच्या वेशीपर्यंत पाेहाेचू शकल्या नाहीत. यंदाही ‘वरुणा’ची चांगली कृपादृष्टी राहील, असे भाकीत हवामान खात्याकडून करण्यात आले हाेते. परंतु, पावसाळ्याचे तीन महिने लाेटत आले असताना काही महसूल मंडळे वगळता जिल्ह्यात एकही दमदार पाऊस झालेला नाही. आजवर तरी ‘वरुणा’ची कृपादृष्टी ‘रिमझिम’च आहे. २८ ऑगस्टअखेर वार्षिक सरासरीच्या केवळ ५२ टक्के म्हणजेच ४४३ मिमी पावसाची नाेंद प्रशासनाच्या दप्तरी झाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात मागील पाच पैकी २०१८-१९ व २०१९-२० ही दाेन वर्ष वगळता सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. २०२०-२१ या वर्षातही पावसाने वार्षिक सरासरी पार केली हाेती. तब्बल ११३.४ टक्के एवढा पाऊस झाला हाेता. वरुणराज्याच्या कृपादृष्टीमुळे जिल्हाभरातील लहान-माेठेे प्रकल्प तुडुंब भरले हाेते. अनेक प्रकल्पांनी धाेक्याची पातळी ओलांडल्याने प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ प्रशासनावर आली हाेती. दरम्यान, यंदाही दमदार पाऊस हाेईल, असे भाकीत जूनपूर्वीच हवामान खात्याकडून केले हाेते. त्यानुसार जूनमध्ये दमदार एंट्रीही केली. या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी उरकली. मात्र, यानंतर वरुणराजाने डाेळे वटारले. पावसाळ्यातील तीन महिने लाेटूनही भूम, वाशी तालुक्यातील काही मंडळे वगळता जिल्ह्याच्या अन्य भागात दमदार पाऊस झालेला नाही. केवळ रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६०.३० मिमी एवढे आहे. मात्र आजवर केवळ ४३४ मिमी पाऊस पडला आहे. याचे प्रमाण ५२ टक्के इतके आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात ४०१ मिमी, तुळजापूर ४६३.८, परंडा ३९१.७, भूम ५२३.३, कळंब ३९८.८, उमरगा ४६३, लाेहारा ३८०.७ तर वाशी तालुक्यात ४५३.७ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. पावसाच्या वक्रदृष्टीमुळे जिल्हाभरातील बहुतांश तळालाच आहेत. त्यामुळे भविष्यातही वरुणराजाची कृपादृष्टी न झाल्यास शहरी तसेच ग्रामीण भागातील जनतेला भीषण टंचाईला ताेंड द्यावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

चाैकट...

वार्षिक सरासरी पर्जन्यमान

७६०.३० मिमी

आजवर झालेला पाऊस

४३४.०० मिमी

झालेल्या पावसाचे प्रमाण

५२.०० टक्के

पाच वर्षातील पाऊस

२०१६-१७ ८३८.१ मिमी

२०१७-१८ ८४८.२ मिमी

१०१८-१९ ४५०.९ मिमी

२०१९-२० ७१३.८ मिमी

२०२०-२१ ८५९.४८ मिमी

पावसाने दडी मारल्याने फटका...

खरीप हंगामातील पिके फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असतानाच पावसाने दडी मारली. त्यामुळे पिकांचे माेठे नुकसान झाले आहे. कधीतरी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे पूर्णत वाया जाण्याच्या मार्गावर असलेली टवटवीत दिसू लागली आहेत. मात्र, अपेक्षित शेंगा लागलेल्या नाहीत. परिणामी २५ ते ४० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येईल, असे शेतकरी सांगताहेत.

Web Title: Varun Raja's favor on the district is 'Rimjim' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.