विद्यापीठातील अभ्यासक्रम हे स्थानिक गरजांशी पूरक हवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:38 IST2021-08-17T04:38:03+5:302021-08-17T04:38:03+5:30
उस्मानाबाद : विद्यापीठ, उपकेंद्र यामधून चालणारे अभ्यासक्रम हे स्थानिक गरजांशी सुसंगत असायला हवेत. जेणेकरून या भागातील अडचणींवर कौशल्याने मात ...

विद्यापीठातील अभ्यासक्रम हे स्थानिक गरजांशी पूरक हवेत
उस्मानाबाद : विद्यापीठ, उपकेंद्र यामधून चालणारे अभ्यासक्रम हे स्थानिक गरजांशी सुसंगत असायला हवेत. जेणेकरून या भागातील अडचणींवर कौशल्याने मात करीत विकास साधता येऊ शकतो, असे मत कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचा सोमवारी वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रमुख कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते. मंचावर प्र-कुलगुरू डॉ. श्याम सिरसाठ, व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर, डॉ. जयसिंगराव देशमुख, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, संचालक डॉ. दत्तात्रय गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू येवले म्हणाले, विद्यापीठाच्या शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्ये विकसित झाली पाहिजेत. तर विद्यार्थी पुढे कोणत्याही आव्हानांना तोंड देऊ शकतो. बी. बी. ठोंबरे म्हणाले, वरचेवर व्यावसायिक अभ्यासक्रमांची गरज ठळकपणे अधोरेखित होत चालली आहे. विशेषत: शेतीपूरक व्यवसायांशी सुसंगत अभ्यासक्रमांची अधिक गरज आहे. भविष्यात शेती क्षेत्रातूनच पुनर्निर्मिती ऊर्जा स्त्रोत तयार करावे लागतील. यातून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यास मदत होईल, असेही ठोंबरे म्हणाले. सिनेट सदस्य संजय निंबाळकर यांनी उपकेंद्रातील शैक्षणिक, संशोधनात्मक कार्याचे कौतुक करुन लोकसहभाग व विद्यापीठाच्या मदतीने उभी झालेली कोविड लॅब ही शिक्षणासोबतच सामाजिक दायित्वाची जबाबादारी पूर्ण करणारी ठरली, असे सांगितले. प्रास्ताविक संचालक डॉ. दत्तात्रय गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. गोविंद कोकणे यांनी केले तर आभार डॉ. जयश्री गायकवाड यांनी मानले. यावेळी डॉ. सचिन देशमुख, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. राजेश करपे, डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. स्मिता अवचार, डॉ. राहुल मस्के यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.
अशोक मोहेकर यांना जीवनसाधना...
प्राचार्य डॉ. अशोक मोहेकर यांनी ज्ञानप्रसारक मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागात चालविलेल्या ज्ञानयज्ञाचा सन्मान याप्रसंगी करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने यंदाचा जीवनसाधना पुरस्कार कुलगुरू डॉ. येवले यांच्या हस्ते प्रदान करुन गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. मोहेकर यांनी हा पुरस्कार हा पुरस्कार त्यांचे वडील शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना समर्पित करीत विद्यापीठाचे आभार मानले. दरम्यान, याच कार्यक्रमात डॉ. प्रशांत दीक्षित, डॉ.एस.ए. अमृतराव यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. तर उपकुलसचिव डॉ. डी. एम. नेटके, डॉ. जे. एस. शिंदे, कर्मचारी एन.एस मस्के, एस. टी. वाघमारे, एम.आर. खंडागळे, किरण शिंदे यांचाही प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.