उस्मानाबाद : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत काढलेल्या उद्गाराच्या निषेधार्थ मंगळवारी उस्मानाबाद शहरात शिवसैनिकांनी आंदोलन केले. दुपारी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोंबड्या उडवून राणे यांची खिल्ली उडवणाऱ्या घोषणा देण्यात आल्या, तसेच त्यांची प्रतिमाही पायदळी तुडविण्यात आली.
भाजप जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून काही आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद मंगळवारी जिल्हाभरात उमटले. खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी कळंब शहरात शिवसैनिकांसह आंदोलन करीत राणे यांचा निषेध नोंदविला, तर उस्मानाबाद शहरात नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. उस्मानाबादेत शिवसैनिकांनी आंदोलनात कोंबड्या आणल्या होत्या. राणे यांची खिल्ली उडवणाऱ्या घोषणा देत शिवसैनिकांनी सोबत आणलेल्या कोंबड्या हवेत उडवल्या. यानंतर राणे यांची प्रतिमा पायदळी घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतरही राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये करणे थांबविले नाही, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिला. यावेळी उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, नगरसेवक सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, राणा बनसोडे, मोईन पठाण, पिंटू कोकाटे, वैभव वीर, विजय राठोड, बापू साळुंखे, विजय ढोणे, धनंजय इंगळे, आबा सारडे, अमोल मुळे, पंकज पाटील, रवी कोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.