अखंडित दुभाजकाचा वाहतुकीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:38 IST2021-09-15T04:38:14+5:302021-09-15T04:38:14+5:30
कळंब : शेगाव-पंढरपूर महामार्गाचे शहरातील काम करत असताना बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरील भागात अखंडित रस्ता दुभाजक करण्यात आल्याने ...

अखंडित दुभाजकाचा वाहतुकीस अडथळा
कळंब : शेगाव-पंढरपूर महामार्गाचे शहरातील काम करत असताना बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरील भागात अखंडित रस्ता दुभाजक करण्यात आल्याने मोठ्या वाहनांना आवारात प्रवेश करण्यास अडथळे येत आहेत. यामुळे बाजार समितीने रस्ते विकास महामंडळास पत्र देऊन यास विरोध दर्शवला आहे.
कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील प्रमुख कृषी बाजारपेठ आहे. जवळपास २७ एकर क्षेत्रातील विस्तीर्ण बाजार आवारात शेतमालासह विविध व्यवसाय थाटलेले आहेत. याशिवाय वखार महामंडळ, फेडरेशन व बाजार समितीचे गोदाम याच आवारात आहे. अशा या बाजार समितीचे मुख्य असे राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार कळंब-बार्शी रोडवरील होळकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दरम्यान आहे. सदर रस्ता लांबी सध्या शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत विकसित होत आहे. यानुसार नव्याने केलेल्या दोनपदरी सिमेंट रस्त्यावर बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरही डिव्हायडर टाकण्यात आले आहे. यामुळे बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाजार आवारात प्रवेश करताना मोठ्या वाहनांसह अन्य वाहनांना अडथळा येत आहे. येरमाळा, ईटकूर, वाशी, पारा, दहिफळ आदी भागातून बाजार आवारात येत असलेल्या वाहनांना पुढे वळसा घालून ढोकी रोडवरील प्रवेशद्वारातून यावे लागत आहे.
चौकट...
रस्ते विकास, ठेकेदाराला पत्र
दरम्यान, यासंदर्भात बाजार आवारात ये-जा करणाऱ्या वाहनांना शेगाव-पंढरपूर रस्त्याचे काम करताना टाकलेल्या डिव्हायडरमुळे अडचण येत आहे. यामुळे हे डिव्हायडर काढावे, अशी मागणी बाजार समितीने जालना येथील रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयाकडे व संबंधित हैदराबाद येथील ठेकेदार कंपनीकडे केली आहे, असे बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ यांनी सांगितले.