आठ दिवसांत दोन हजार ९१४ जणांना टोचली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:16 IST2021-02-05T08:16:40+5:302021-02-05T08:16:40+5:30

एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात काेरोना विषाणूचा शिरकाव झाला होता. जुलै-ऑगस्ट महिन्यांपासून बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली. या आजारावर प्रभावी औषध ...

Two thousand 914 people were vaccinated in eight days | आठ दिवसांत दोन हजार ९१४ जणांना टोचली लस

आठ दिवसांत दोन हजार ९१४ जणांना टोचली लस

एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात काेरोना विषाणूचा शिरकाव झाला होता. जुलै-ऑगस्ट महिन्यांपासून बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली. या आजारावर प्रभावी औषध नसल्यामुळे ५७४ जणांनी उपचारादरम्यान दम तोडला. त्यामुळे प्रत्येकाचे लक्ष हे लस कधी मिळेल, याकडे लागले होते. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर १६ जानेवारीपासून उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालय, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय, उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील केंद्रावर लसीकरणास प्रारंभ झाला. प्रत्येक केंद्रास १०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पहिल्या दिवशी तिन्ही केंद्रांवर एकूण २१३ जणांनी लस घेतली. पहिले दोन ते तीन दिवस लसीकरणास अकारण भीतीपोटी कर्मचाऱ्यांनी लस घेण्याकडे पाठ फिरविली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांसह डॉक्टरांनी लस टोचून घेतल्यानंतर आरोग्य कर्मचारी लस घेण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. मागील आठ दिवसांत दोन हजार ९१४ जणांनी लस घेतली आहे. यात ९०२ पुरुष, दोन हजार १२ महिलांचा समावेश आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून जिल्ह्याच्या लसीकरणातील स्थानाबाबत माहिती प्राप्त होत नसल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

लसीकरणात महिला आघाडीवर

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शासकीय व खाजगी वैद्यकीय सेवेत फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे. लस घेण्यासाठी कोविन ॲपवर ९ हजार १०० जणांनी नोंदणी केली आहे. मागील आठ दिवसांत यातील २ हजार ९१४ जणांनी लस घेतली आहे. यामध्ये २ हजार १२ महिलांचा समावेश आहे.

डोसचा दुसरा साठाही झाला प्राप्त

पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेल्या ९ हजार १०० जणांना पहिला व दुसरा असे दोन डोस देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १० हजार ५० डोस उपलब्ध झाले आहेत. दुसऱ्या डोससाठी दुसऱ्या टप्प्यात ९ हजार लस आरोग्य विभागास प्राप्त झाल्या आहेत.

जिल्ह्यात उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा या तीन ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करून लसीकरण मोहीम राबविली जात होती. आता कळंब, वाशी, भूम, परंडा, लोहारा या ठिकाणी लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला आहे.

त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढू लागले आहे. १४ फेब्रुवारीपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून सांगण्यात आली.

Web Title: Two thousand 914 people were vaccinated in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.