जुळ्या भावंडांनी घेतली भारतीय सैन्यात उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:33 IST2021-03-27T04:33:47+5:302021-03-27T04:33:47+5:30
विकास, आकाश ही दोन जुळी भावंडे दिसायला, स्वभावात अन् शैक्षणिक गुणवत्तेतही अगदी सारखी. या दोघांचेही दहावीपर्यंतचे शिक्षण अणदूरच्या जवाहर ...

जुळ्या भावंडांनी घेतली भारतीय सैन्यात उडी
विकास, आकाश ही दोन जुळी भावंडे दिसायला, स्वभावात अन् शैक्षणिक गुणवत्तेतही अगदी सारखी. या दोघांचेही दहावीपर्यंतचे शिक्षण अणदूरच्या जवाहर विद्यालयात झाले. दहावी परीक्षेतही एकाला ९७, तर एकाला ९८ टक्के गुण मिळाले. विकास यांनी कराटे क्षेत्रात, जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर, तर आकाशने जिल्हा, विभाग, पातळीवर क्रीडा क्षेत्रात सुवर्णपदके पटकावली आहेत. त्यांची देशपातळीवर खेळण्याची तयारी सुरू आहे.
या दोघांनीही दहावीनंतरचे शिक्षण सोलापूर येथे सुरू आहे. त्यांचे वडील बापूराव माने यांनी भारतीय सैन्यात २८ वर्षे सुभेदार पदावर सेवा केली आहे. जीवनात जिवाची बाजी लाऊन देशासाठी लढणे आणि देशासाठी मरण पत्करणे हेच मोठे भाग्य असते व हीच खरी देशसेवा होऊ शकते, हे संस्कार त्यांनी मुलांवर रूजविले. त्यामुळे आपल्या मुलांनीही सैन्य दलात भरती व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. वास्तविक या दोन्ही मुलांची वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात सहजच वर्णी लागली असती. परंतु, त्यांनी इतर क्षेत्राला बगल देत केवळ वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या जुळ्या भावंडांची २४ मार्चरोजी हैदराबाद येथे भारतीय सैन्यात भरती झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.