सव्वादोनशे शेतकऱ्यांना मिळेना शेततळ्याचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:33 IST2021-01-23T04:33:14+5:302021-01-23T04:33:14+5:30
उस्मानाबाद : वर्ष-दाेन वर्षांआड पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना शेती तोट्याची ठरत होती. त्यामुळे शासनाने दुष्काळी भागात पाणी साठवण करून कमी ...

सव्वादोनशे शेतकऱ्यांना मिळेना शेततळ्याचे अनुदान
उस्मानाबाद : वर्ष-दाेन वर्षांआड पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना शेती तोट्याची ठरत होती. त्यामुळे शासनाने दुष्काळी भागात पाणी साठवण करून कमी पाण्यात शेतपिके घेण्यासाठी मागेल त्याला शेततळे योजना कार्यान्वित केली होती. या योजनेस शेतकऱ्यांंतून चांगला प्रतिसाद मिळत होता. चार वर्षांत तब्बल ३ हजार ९२७ शेतकऱ्यांंनी शेततळे घेतले आहे. यातील सव्वादोनशे शेतकऱ्यांंना अद्यापही शेततळ्याचे अनुदान मिळाले नाही. राज्यात बहुतांश भागांत वर्ष-दोन वर्षांआड दुष्काळाला सामोरे जावे लागत असते, तर काही भागांत अल्पपर्जन्यमान झाल्याने शेती पिकांसाठी पाण्याचा प्रश्न जटिल बनत असे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना शेती करणे कठीण होते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने २०१६-१७ पासून मागेल त्याला शेततळे योजना कार्यान्वित केली. जिल्ह्यात पहिल्या वर्षी या योजनेस शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शासनाने शेततळ्यांचे उद्दिष्ट वाढविले होते. मागील चार वर्षांत जिल्ह्यासाठी ३ हजार ७०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले हाेते. जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे ३ हजार ९३० शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे शेततळ्यासाठी अर्ज केले होते. कृषी विभागाने आलेले अर्ज मंजूर करून शेतकऱ्यांंना शेततळे पूर्ण करण्यास सूचना केल्या. यातील ३ हजार ९२७ शेतकऱ्यांंनी काम पूर्ण करून घेतले आहे. तीन शेतकऱ्यांच्या कामांचे फोटो काढणे शिल्लक राहिले आहे. ३ हजार ७०५ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे, तर अद्यापही सव्वादोनशे शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे.
कोट...
चार वर्षांत जिल्ह्यासाठी ३ हजार ७०० शेततळ्यांचे उद्दिष्ट मिळाले हाेते. ३ हजार ९३० शेतकऱ्यांनी शेततळ्याची कामे पूर्ण केली आहेत. शेततळ्याच्या माध्यमातून शेती सिंचनाखाली आली आहे. २२५ शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आहे. निधीची मागणी शासनाकडे केली आहे.
उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी