मंचकी निद्रा, घटस्थापना आणि सीमोल्लंघन! तुळजाभवानीच्या नवरात्र उत्सवाचे वेळापत्रक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 15:35 IST2025-09-09T15:30:03+5:302025-09-09T15:35:02+5:30
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी! महिषासूर मर्दिनी अलंकार पूजा आणि इतर विधींची तयारी सुरू

मंचकी निद्रा, घटस्थापना आणि सीमोल्लंघन! तुळजाभवानीच्या नवरात्र उत्सवाचे वेळापत्रक जाहीर
धाराशिव : श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला १४ सप्टेंबरपासून सुरुवात आहे. यादिवशी सायंकाळी देवीची मंचकी निद्रा सुरू होणार असून, ती नऊ रात्री पूर्ण झाल्यानंतर संपुष्टात येईल. महिषासुराचा वध करण्यापूर्वी देवीने घेतलेली ही विश्रांती असल्याची आख्यायिका सांगितली जाते. दरम्यान, या महोत्सवाची कोजागिरी पौर्णिमेला सांगता होणार असल्याचे मंदिर प्रशासनाने कळवले आहे.
तुळजाभवानी देवीच्या वार्षिक शारदीय नवरात्र महोत्सवाची भाविकांना उत्कंठा लागून असते. या महोत्सवादरम्यान राज्यभरातून भाविक भवानी ज्योत नेण्यासाठी तुळजापुरात दाखल होत असतात. शिवाय, दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते. हा महोत्सव १४ सप्टेंबरपासून सायंकाळी मंचकी निद्रेने सुरुवात होईल. पुढील नऊ दिवस देवीची निद्रा सुरू राहील. २२ सप्टेंबर रोजी पहाटे निद्रा संपुष्टात येऊन दुपारी १२ वाजता विधिवत घटस्थापना होईल. यानंतर २३, २४ व २५ रोजी नित्योपचार पूजा व रात्री छबिना मिरवणूक निघणार आहे. २६ रोजी ललित पंचमीनिमित्त देवीची रथालंकार पूजा बांधण्यात येणार आहे. २७ सप्टेंबर रोजी मुरली अलंकार, २८ रोजी शेषशाही, तर २९ रोजी भवानी तलवार अलंकार पूजा बांधण्यात येईल. ३० रोजी दुर्गाष्टमीनिमित्त महिषासूर मर्दिनी अलंकार पूजा होईल.
१ ऑक्टोबर रोजी धार्मिक विधीने घटोत्थापन होणार आहे. याच दिवशी रात्री नगरहून येणारे पलंग व बुऱ्हाणपूर येथील संत जानकोजी भगत पालखीची मिरवणूक काढली जाईल. २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त देवीचा सीमोल्लंघन सोहळा व मंदिरातील मिरवणुकीनंतर पुन्हा देवीची मंचकी निद्रा सुरू होणार आहे. कोजागिरी पौर्णिमेनंतर ७ ऑक्टोबर रोजी पहाटे मंदिर पौर्णिमेचे औचित्य साधून देवी मूर्तीची पुन्हा सिंहासनावर प्रतिष्ठापना होईल व रात्री सोलापूरच्या काठ्यांसह छबिना व जोगवा हे विधी होतील. ८ ऑक्टोबर रोजी या शारदीय महोत्सवाची महाप्रसादाने सांगता होणार आहे.